महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत 238 रुग्णांची तपासणी
गंभीर रुग्णांवर आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया व उपचार
मानोरा: मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी दिनांक 14 जून रोजी परिसरातील रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्ण तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 238 रुग्णांनी तपासणी करण्यात आली. संत. श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये गंभीर व शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांवर आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये मोफत औषधोपचार, उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
याशिबिरात कॅन्सर, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, अस्थिव्यंग, स्त्रीरोग, संसर्गजन्य विकार, हृदय विकार, श्वसन विकार, संधिवात इत्यादी विविध रोगांवरील रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे तपासणी करण्यात आली. याशिवाय रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजने विषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झाल्याने गरीब रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. या योजने अंतर्गत 971 आजारांवर मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रिया केली जाते. कोणताही गरीब रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहू नये यासाठी आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये मार्गदर्शनासाठी विशेष काउंटर सुरू करण्यात आला आहे. या योजनेची माहित अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांंनी केले.