नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली
नेत्यांचे प्रधान सचिवांकडे बदली रद्द करण्यासाठी साकडे
विवेक तोटेवार, वणी: येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बुधवारी प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मालेगांवचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील हे वणीत रुजू होणार आहेत. मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली रद्द करावी म्हणून नगराध्यक्ष व आमदार हे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवाकडे साकडे घालीत असल्याचे वृत्त आहे.
वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची 24 जुलै बुधवारी नगर विकास मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार प्रशासकीय कारणावरून घाटंजी येथे बदली करण्यात आली. ते मागील दोन वर्षांपासून वणी नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या ठिकाणी मालेगांव नगर परिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील यांची वणी येथे बदली करण्यात आली आहे.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी बदली रद्द करण्याकरिता नगर विकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवास पत्रव्यवहार केल्याचे समजले आहे. बोरकर यांच्या बदलीने विकासकामांचा वेग मंदावेल व तसेच अनेक नगरसेवकांची तशी इच्छा असल्याचे पत्रात म्हटले आहे.
25 जुलै रोजी बोरकर यांना घाटंजी येथे मुख्याधिकारी पदावर रुजू होण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. या बदलीमधे राजकारण असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे.