सुशील ओझा, झरी: कर्तव्याच्या वेळी दारू ढोसून गाडी चालवणे व स्टन्ट करणे एका चालकास चांगलेच महागात पडले. दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. मांगली गावाजवळ संतप्त झालेल्या प्रवाशांनी आणि गावकऱ्यांनी चालकाला चांगलाच चोप देत त्याला पोलिसांचा ताब्यात दिले. झालेल्या प्रकारामुळे चालकाला निलंबीत करण्यात आले आहे.
विद्यार्थी व चाकरमान्यांच्या सोयीसाठी महामंडळाची वणी ते मार्की ही बस सुरू आहे. संध्याकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान मुकूटबन येथील विद्यार्थी घरी परत जाण्याकरिता या बसमध्ये बसले. काही वेळात बसचा चालक प्रशांत खैरे (24) हा दारू पिऊन असल्याचे विद्यार्थ्यांना आढळले. अध्ये मध्ये हा चालक स्टेअरिंगवरचा हात सोडून गाडी चालवत होता. त्यातील काही मुलींना चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय आला. त्याबाबत त्यांनी चालकाला विचारणा केली असता त्याने त्याने हो असे उत्तर देत तुम्ही तुमचं काम करा बोलला.
कट मारत व स्टेअरिंग सोडून गाडी चालवत असल्याने विद्यार्थीनी घाबरल्या. त्यांनी आपल्या पालकांना लगेच याची माहिती दिली. माहिती मिळताच परिसरातील अर्धवन, पांढरकवडा (ल) मार्की व भेंडाळा गावातील संतप्त पालक व गावकरी मांगली गावाजवळ गोळा झाले. त्यांनी गाडी थांबवून चालकास खाली उतरवले. त्यानंतर चालकाला चोप देऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, जमादार मारोती टोंगे, पुरूषोत्तम घोडाम व सुलभ उईके पोहचले. चालक प्रशांत खैरे याला ताब्यात घेतले. त्यावेळी संतप्त पालक, शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी चालकाविरुद्ध कार्यवाहीची मागणी केली. तसेच वणी डेपोतील अधिकारी यांना सुद्धा पाचारण करून पोलीस स्टेशन ला बोलाविण्यात आले. चालकविरुद्ध पोलिसांनी दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालविणे अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर डेपोने चालकावर निलंबणाची कार्यवाही केली आहे.