विवेक तोटेवार, वणी: 7 जुलै मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान दरम्यान वणी पोलिसांनी जत्रा मैदानजवळ असलेल्या मंजुषा बार समोर गोमांस विक्री करणाऱ्यांवर धाड टाकली. या कार्यवाहीत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. गोवंश हत्येबाबत ही पहिलीच कारवाई मानण्यात येत आहे. यांच्याकडून 1 लाख 70 हजारांचे गोवंश व मांस जप्त करण्यात आले आहे.
दुपारी पोलिसांना जत्रा मैदानाजवळील मंजुषा बार समोर एका टिनाच्या शेडमध्ये काहीजण गौवंश कापून त्याचे मांस विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीवरून वणी पोलिसाचे डीबी पथक घटनास्थळाचा दिशेने निघाले. घटनास्थळी त्यांना दिसून आले की काहीजण गोवंश कापून त्याच्या मांसाची विक्री करीत आहे. समोर सहा गाई तर मागे बनलेल्या शेडमध्ये सात गाई होत्या. त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यांना निर्दयपणे बांधून ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी धाड टाकताच सात पैकी चार जण पोलिसांच्या हाती लागले तर तीन जण फरार होण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्यांची नावे सय्यद मोहम्मद सय्यद राज (39), जुबेर मुनाफ कुरेशी (55), मोहम्मद अनिल अनिस कुरेशी (45), तोसिफ रईस कुरेशी (30) असे आहे. तर एजाज अजीज कुरेशी (50), पाशा अजीज कुरेशी (40), कैसर अजीज कुरेशी (35) हे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. वणी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे.
आरोपींकडून 9 गाई, 4 गोरे ताब्यात घेण्यात आले आहे. यातील काही जनावरं जखमी असल्याचे समोर आले आहे. तर 100 किलो मांस जप्त करण्यात आले आहे. हे मांस सडलेल्या अवस्थेत होते. तेच मांस विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. सदर मांस उग्र वास येत असल्याने त्या मांसाची जमिनीत खड्डा करून त्यात टाकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून फरार आरोपी अद्याप हाती आलेले नाही.