सुशील ओझा, झरी: कोळशाच्या जड वाहतुकीने परिसरातील रुईकोट ते अर्धवन रस्त्यांची ऐसीतेसी झाली आहे. मोठमोठाले खड्डे पडलेत. त्यामुळे या मार्गावर दिवसभर अनेक किरकोळ अपघात होत असतात. मात्र या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठ्या गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा कोळसा या मार्गावरील नागरिकांची जिंदगी ‘खड्ड्यात’ घालेल काय असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यातील लहान पांढरकवडा परिसरात टॉपवर्थ कोळसा खाण आहे. इथून कोळश्याची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात वणी,चंद्रपूर, नागपूर व इतर ठिकाणी होते. त्यामुळे अर्धवन ते रुईकोट ४ किमी अंतराच्या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून अपघातात मोठी वाढ झाली आहे. रुईकोट ते अर्धवन खेडेविभागाला जोडणारा सिंगल रोड आहे. या रोडची क्षमता कोळशाची जड वाहतूक करण्यायोग्य नाही. या मार्गावरून सुसाट वेगाने कोळसा भरलेली मोठं मोठी ट्रक धावतात. त्यामुळे सदर रोडची अक्षरशः चाळणी झाली असून पायी चालणेसुद्धा कठीण झाले.
मुकूटबन ते रुईकोट मार्ग अर्धवन, मार्की, पांढरकवडा (ल), अडकोली पवनार पर्यंत जाणारे दुचाकी, ऑटो व सायकलचालकांना मोठा त्रास होत आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे पाण्यामुळे दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वार पडतात. तर अनेकांचे अपघात होत आहेत. या मार्गावर वरील गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता मुकूटबन येथे ऑटो व शालेय बस ने येणे जाणे करावे लागते.
कोळशाच्या भरलेल्या ट्रकमुळे पडलेल्या गड्यांमुळे अनेक ठिकाणी बस ऑटो फसतात. अनेकदा वाहने बंद पडतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनाच खूप त्रास सहन करावा लागत आहे. दिवस रात्र सुरु असलेल्या कोळश्याच्या जड वाहतुकीकडे पोलीस व आरटीओ यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. जनतेच्या सुख-दु:खाशी यांना काहीच घेणे देणे नसल्याचे पाहायला मिळत आहे.
कोळशाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्याची चाळणी झाली. याकडे शासकीय बांधकाम विभागही झोपेचे सोंग घेतलेलं दिसत आहे. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संंबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.अन्यथा परिसरातील गावकरी आंदोलनाच्या तयारीत आहे.