“साहेब, कर्जामुळे मी आत्महत्या करतोय” कर्जबाजारी शेतकऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, आणि मग….
कार्यालयात उडाली खळबळ, प्रशासन लागलं कामाला... समोर आली धक्कादायक माहिती....
ज्योतिबा पोटे, मारेगाव: “साहेब, मी शेतकरी बोलतोय, कर्जाच्या तगाद्यामुळे मी आत्महत्या करतोय” असा कॉल अचानक कलेक्टर ऑफीरला येतो. कार्यालयाचे धाबे दणाणते. सर्वत्र धावपळ, चौकशी, फोनाफोनी सुरू आणि अनेक प्रक्रियांना आरंभ होतो… जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सर्वांचेच डोळे विस्फारले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हाची ओळख आहे. मारेगाव तालुक्यात ८०% शेतकरी कोरडवाहू शेती करीत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आलेख खाली आला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सोसायटी, बँक, खाजगी सावकार, फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन आपले व्यवहार करतात. जवळपास सर्वच शेतकऱ्यांवर कर्ज आहे. या कर्जाच्या बोज्यातून अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. नुकतंच एका घटनेनं प्रशासनाला चांगलाच घाम फोडला.
मारेगाव तालुक्यातील धामणी येथे बंडू वामण राऊत हा शेतकरी राहतो. या शेतकऱ्यानं एका फायनान्स कंपनीकडून ८० हजारांचं कर्ज घेतलं होतं. कर्ज फेडू न शकल्यामुळे त्यांच्याकडे फायनान्स कंपनीचा त्याच्याकडे कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होता. अखेर या तगाद्याला कंटाळून त्यानं एक नवीन शक्कल लढवली. त्यानं मंगळवारी चक्क यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना कॉल केला. कॉल करून त्यानं म्हटलं की फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याने मी आत्महत्या करीत आहे.
या कॉलनं अधिकारी वर्गाची चांगलीच झोप उडाली. सर्वत्र धावपळ सुरू झाली. सूत्र हलायला सुरूवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेतली. त्यांनी लगेच सूत्र हलवत बंडू राऊतला मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तिथं उपचार सुरू झाले. त्यावेळी मारेगावचे तहसीलदार विजय साळवे यांनी रूग्णालयात जाऊन चौकशी केली.
चौकशीत काही वेगळीच माहिती समोर आली. बंडू हा दारूच्या आहारी गेल्याचं त्यांना कळलं. तसंच त्याच्यावर फायनान्स कंपनीचं कर्ज असल्याचंही समोर आलंय. आता त्याने जिल्हाधिकाऱ्यांना कॉल हा कर्ज वसुलीच्या तगाद्यातून केला की दारूच्या व्यसनातून हे अद्याप कळू शकले नाही. मात्र एका कॉलने प्रशासकीय अधिकाऱ्यांची झोप उडून या गंभीर घटनेविषयी त्यांची कर्तव्यदक्षता दिसून आली.