विवेक तोटेवार, वणी: शहराची वाहतूक बघता या ठिकाणी वाहतूक उपशाखा स्थापन करण्यात आली. परंतु आता शहरात फक्त चार वाहतूक कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला आहे. ज्या ठिकाणी 26 कर्मचारी होते, त्या ठिकाणी फक्त चार कर्मचारी हे न पटणारे गणित वणीत मांडले आहे.
वाहतूक पोलिसांपैकी काहींच्या बदल्या झाल्यात. काहींची वणी पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली. वाहतूक शाखा वणीत असल्याने वणीत एकमार्गी वाहतूक नियम आणण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावयास लावणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास दंड देणे या प्रकारचे काम होते. प्रत्येक चौकात वाहतूक कर्मचारी कर्तव्यावर राहत होता.
परंतु आता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यातच अपघाताच्याही प्रकरणात वाढ झाली आहे. खुलेआम नियमांचे उल्लंघन होत आहे. परंतु वाहतूक सुरळीत करणारे आता फक्त हातावर हात धरून बसून आहे. कर्मचारी नसल्याने शाखा बंद होते की काय अशी अवस्था झाली आहे.
सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार आयरे रजेवर आहेत. अशा वेळी वाहतूक शाखेचा संपूर्ण भार पोऊनी प्रफुल डाहूले यांच्यावर आला आहे. यांच्यातील एक महिला व एक पुरुष पोलीस कॉन्स्टेबल यवतमाळ येथे ट्रेनिंगला गेले आहेत. एक कर्मचारी कार्यालय सांभाळतो तर एक कर्मचारी बस्थानाकजवळ कर्तव्यावर असतो. वणीतील मुख्य चौकांत कोणताही कर्मचारी नसतो.
अगोदर प्रत्येक चौकात दोन कर्मचारी असायचे आणि आता मात्र एकही कर्मचारी नाही ही अवस्था झाली आहे. ही परिस्थिती असल्यास एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता बळावत आहे. या उपशाखेत आता पोलीस विभाग कर्मचारी देणार की शाखा बंद पडणार याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.