झरी तालुक्यात स्वाक्षरी अभियान दौरा
वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना विविध समस्येबाबत निवेदन सादर
सुशील ओझा, झरी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुवारी झरी तालुक्याचा दौरा करण्यात आला. दरम्यान परिसरातील विजेच्या समस्यांबाबत वीज वितरण कंपनीला विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात हे स्वाक्षरी अभियान सध्या सुरू आहे. यानिमित्त ठिकठिकाणी दौरे काढून चावडीवर, चौकात, पारावर लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन विजेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
गुरुवारी झरी तालुक्यात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. यावेळी गावातील चौकात स्टॉल लावून लोकांना या अभियानाची माहिती देऊन लोकांच्या स्वाक्ष-या घेण्यात आल्या. यात सुमारे 2.5 हजार लोकांनी स्वाक्षरी केली. यात झरी, जामणी, खापरी, शिरोला, चिखलडोह, पाटण, सालेभट्टी इत्यादी गावांचा दौरा करण्यात आला.
थ्री फेस विजेच्या मागणीसाठी निवेदन सादर
मुकुटबन आणि काही मुख्य भागांतच थ्री फेज लाईन आहे. पण मुकुटबन बसस्टॉप ते पिंपरड मेन रोडवरील ही थ्री फेज लाईन आजूबाजूच्या गावांना मिळत नाही. गावांत एकाच खांबावर अनेक घरांचं वीज कनेक्षन आहे. यामुळे विजेबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अभ्यास करणारे विद्यार्थी, लहान मुलं आणि वृद्धांना याची झळ पोहचत आहे. तसेच गणेशपूर येथील झोपडीत राहणा-या व्यक्तीला सव्वा लाखाचे बिल देण्यात आले होते. या दोन्ही तक्रारीबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना गावक-यांतर्फे संजय देरकर यांच्या उपस्थितीत निवदेन सादर करण्यात आले.
यावेळी संजय देरकर, विनोद ढुमणे, संजय देठे, ईखारे, सुलेमान खान, नामदेव जिवतोडे, गंभीर मुके, अशोक गालेवार, शेषराव सोयाम, महादेव कोडापे यांच्यासह संजय देरकर यांचे समर्थक उपस्थित होते.