बीईओने मिळवून दिली कुटुंबातील शिक्षिकेला लगतची शाळा
समायोजनात करण्यात आली दिशाभूल, शिक्षकांनी केला आरोप
वणी: यवतमाळ जिल्हा परिषदेने नुकतेच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केले आहे. तत्पुर्वी मारेगाव तालुक्यातील आठ अतिरिक्त असलेल्या शिक्षकांची यादी जाहिर करण्यात आली होती. समायोजनाच्या दिवशी केवळ सात शिक्षकांचे नावे जाहिर करण्यात आली होती. यात मारेगांव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार-यांनी कुटुंबातील महिलेला अगदी जवळची शाळा मिळवून देण्यासाठी वरिष्ठांची दिशाभूल केलीये. सदर गाव फलकावर न दाखवता पदाचा दुरूपयोग करीत समायोजन प्रक्रीया पार पाडल्याचा आरोप मारेगाव तालुक्यातील शिक्षकांकडून होत आहे. या गंभीर प्रश्नावर आता मुख्यकार्यकारी अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणा-या आठ शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यानुसार त्यांचे समायोजन जिल्हा स्तरावरून करण्यात येणार होते. यातील ऋषीकांत पेचे- मच्छींद्रा, विद्या किनाके- जानकाईपोड, दुर्गाप्रसाद तिवारी-रोहपट, प्रमोद चांदूरकर-वसंतनगर, रामेश्वर राऊत-सराठी, संदीप कोल्हे-आपटी, मीना पिसे-खैरगाव बुटी, सुनिल रामटेके-पंढेरी हे शिक्षक अतिरिक्त ठरले होते.
यातील सात शिक्षक समायोजन प्रक्रियेला उपस्थित राहीले. उपस्थितांना समायोजन प्रक्रियेत रिक्त पदे असलेल्या शाळा दाखविण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबधीत शिक्षकांनी सोईचे गावे निवडली. त्यात ऋषीकांत पेचे वेगाव, विद्या किनाके खैरगाव, दुर्गाप्रसाद तिवारी गाडेगाव, प्रमोद चांदूरकर बिहाडी पोड, रामेश्वर राऊत कुंभी पोड, संदीप कोल्हे आपटी, सुनिल रामटेके सागपोड अशा शाळा घेतल्या.
या समायोजन प्रक्रियेत संबधीत शिक्षकांना वरूड शाळा कुठेच दाखविण्यात आली नाही. या सात शिक्षकांचे नावे शिक्षकांच्या वॉट्सअप गृपवर प्रसिध्द झाली. मात्र मीना पिसे या गटशिक्षणाधिका-यांच्या सुनेचं नाव कुठेच आढळले नाही. मीना पिसे यांचे पार्डी येथील शाळेत समायोजन करण्यात आल्याची कुजबूज शिक्षकांमध्ये होती. पण सात लोकांची नावे प्रकाशित झाल्यांनतर गटशिक्षाणिका-यांच्या कुटुंबातील महिला शिक्षिकेला तालुक्यालगत असलेल्या वरूड शाळा देण्यात आली आहे. असा आरोप शिक्षकांनी केला आहे.
अनुक्रमे मीना पिसे यांचा क्रमांक सातव्या स्थानावर असताना त्याआधी येणा-या महिला शिक्षकांनी जवळची शाळा सोडून दूरची शाळा कशी निवडली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच वरूड शाळेचे नाव संबधीत यादीतून गहाळ केले की त्या शाळेत स्वतः पदाची निर्मिती केली हे एक कोडेच आहे. पार्डी येथे समायोजन करण्यात आल्यानंतर लगेच सातव्या क्रमांकावर असलेल्या शिक्षीकेला पंचायत समिती पासून अगदी जवळ असलेल्या शाळेवर समायोजन करण्यात आले हे नवलच आहे.
प्रथम क्रमांकावर असलेले ऋषीकांत पेचे हे हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांनी जवळची शाळा सोडून दूरची शाळा का घेतली असा प्रश्न देखिल उपस्थित होत आहे. एकूणच मुख्यकार्यकारी अधिकारी यांची दिशाभूल करीत मारेगांव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिका-यांनी सुनेला जवळचे गाव देण्यासाठी खटाटोप केला आहे, आरोप सध्या शिक्षकातून होत आहे.
(हे पण वाचा: दोन गुरू एक चेला, शिक्षणाचा अजब झमेला)
गुणानुक्रमे सातव्या क्रमांकावर असलेल्या महीलेला जवळचे गाव मिळत आहे. तर दुस-या क्रमांकावर असलेल्या महिला शिक्षिकेलाही दूरचे गाव घ्यावे लागले आहे. हा काय झोल आहे प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन पदाचा दुरूपयोग करणा-या अधिका-यावर कारवाई करणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे आजाराने ग्रस्त असलेले शिक्षक, तसेच इतर महिला शिक्षिकांवर एक प्रकारचा अन्याय करण्यात आला आहे असा आरोप शिक्षक करत आहेत.