सासरच्या जाचाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
तीन दिवसांनी पोलिसांना मिळाल्या डॉक्टरने लिहिलेल्या चिठ्या
जळगाव: सासरच्या मंडळींनी माहेरून महागड्या वस्तू आणण्यासाठी छळ केल्याने डॉ. स्वाती अभिजीत पाटील (२३) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी स्वातीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत. त्या चिठ्ठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. वाघळूद, ता.धरणगाव येथे स्वातीचे सासर, तरकठोरा, ता. जळगाव येथील माहेर होते.
डॉ. स्वातीने २५ जुलै रोजी दुपारी राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. स्वातीने बोराडी, ता. शिरपूर येथे बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले व आत्महत्येच्या आदल्या दिवशीच तिचीडॉक्टर म्हणून नोंदणीही झाली होती.
स्वातीचे वडील सुनील यांनी लग्नात मनाप्रमाणे हुंडा व सात तोळे सोने दिले होते. तरीही सासरे डॉ.गोपाळ पाटील व सासू मीराबाई यांच्याकडून तिचा छळ केला जात होता. वाशिंग मशिन, फ्रीज व बेडरुमध्ये फर्निचर तसेच महागडा मोबाइल आदी वस्तू माहेरून आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावण्यात येत होता. आपल्याकडे इतका पैसा असतानाही शेतकरी असलेल्या वडीलांकडे किती मागायचे. सर्व मलाच दिले तर मागे भाऊ पण आहे, त्याला काय देणार असे स्वाती या वारंवार सांगत होत्या. तुमच्या प्रियासारखी मी एकटी नाही.दिले तरी तुमची नवीन अपेक्षा असतेच. तरीही दररोज काही ना काही कारणाने छळ सुरूच होता. पती डॉ. अभिजीत यांना सांगितले, तर तू माझ्यामागे कटकट लावू नको असे सांगतात. पतीच ऐकून घेणार नाही, तर मग मी कोणाकडे सांगू, अशी व्यथा स्वातीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मांडली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली ही चिठ्ठी तीन दिवसानंतर कुटुंबाला आढळली व ती त्यांनी पोलिसांकडे सादर केली. त्यामुळे पती डॉ.अभिजीत पाटील, सासरे डॉ.गोपाळ पाटील व सासू मिराबाई पाटील या तिघांविरुध्दपोलिसांनी २८ जुलै रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पती आणि सासू-सासरे पसार झाले असून तिघांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केल्याचे कळते.