सुशील ओझा, झरी: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकमेव निवडून आलेल्या काँग्रेस खा. बाळू धानोरकरांनी निवडणुकीनंतर झरी तालुक्यात दर्शन दिले नव्हते. या भागातील कुणबी समाजासह सर्व घटकातील नागरिकांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. खासदार झाल्यानंतर त्यांची भेटच झरी परिसरासाठी दुर्मिळ झाली होती. कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेने त्यांच्या सत्काराचा योग जुळवून आणला. त्यातूनच तालुकावासीयांच्याही नशिबी खासदार भेटीचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणजे बाळू धाणोरकर. अत्यंत करारी व्यक्तिमत्त्व असलेल्या धानोरकरांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरांना पराभूत केले. भाषा चातुर्य, प्रश्नांना भिडण्याची क्षमता व जहाल स्वभावामुळे धानोरकर तरुणाईला आकर्षित करणारे नेतृत्व ठरले. त्यांच्या विजयात झरी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांचा मोठा वाटा आहे. मात्र, निवडणूक होवून तीन महिने उलटल्यानंतरही त्यांचा एकही कार्यक्रम तालुक्यात झाला नाही. त्यातूनच काँग्रेसमधील गटबाजी दिसून आली. खा. धानोरकरांची तालुक्यातील जनतेला भेट कधी होईल, असा प्रश्न विचारला जात होता, अखेर कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेने घेतली.
संस्थेने ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी स्थानिक गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात खा. धानोरकरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. त्याबरोबर खा. धानोरकरच्या हस्ते तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाला सरपंच शंकर लाकडे, खा. बाळू धानोरकर, प्रमुख पाहुणे डॉ. प्रेमनाथ लोढे, विनोद गोडे (शिक्षक) नेताजी पारखी- अध्यक्ष राहणार आहे. कार्यक्रमाला समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील ढाले यांनी केले आहे.