राज्य महामार्गावरील वाहनांच्या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता
संबधीत विभागाचं 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष
वणी: करंजी-वणी-घुग्घूसकडे जाणा-या लालपुलीया परिसरातील चौपदरी रस्त्यावर एसीएस या वाहतूकदार कंपनीचे अवजड वाहने भर रस्त्यावर उभी केली जात आहे. सोबतच ही वाहने विरूध्द दिशेनं सुध्दा काढण्यात येत आहे. परिणामी या परिसरात आधीच अपघात होत असताना आणखी अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. राज्य महामार्गावर अगदी रस्त्यावर वाहने उभी असताना, संबधीत विभागमात्र याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून होत आहे.
वणी शहरालगत असलेल्या लालपुलीया परिसरात अनेक वाहतूकदार कंपन्यांचे कार्यालय आहे. कोळशाची बाजारपेठ असल्यानं येथील व्यवसाय भरभराटीस आला आहे. या परिसरात अनेक व्यवसाय वृध्दींगत झाले आहे. वणी बायपास कडून वरोराकडे जाणा-या मार्गावर एसीएस या सिमेंट कॅरिअर वाहतूकदार कंपनीची वाहनं दिवसरात्र चौपदरी रस्त्यावर उभी केली जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजून वाहनांची भली मोठी रांग असते. वाहनांच्या चाकाला लागलेलं चिखल डांबरी रस्त्यावर पडून रस्त्याची अवस्था बिघडली आहे. तर रस्त्यावर चिखळ असल्यानं दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. सोबतच विरूध्द दिशेनं बेधडक वाहनं चालविली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे संबधीत विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
(नारीशक्तीचा विजय,रासा बोर्डा येथील महिलांनी पकडली अवैध दारू)
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य महामार्गावर अतिक्रमण असताना संबधीत विभाग मात्र मूग गिळून गप्पच आहे. महामार्गावर अतिक्रमण करून वाहतूकदार कंपन्यांची एकाधिकारशाही वाढल्यानं सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भर रस्त्यावर वाहने उभी असताना याकडे दूर्लक्ष करून संबधीत विभाग या वाहतूकदार कंपन्यांची पाठराखण तर करीत नाही ना असा प्रश्व उपस्थित होत आहे. लालपुलीया परिसरात आधीच अपघात होतात, आता वाहतूक कंपनीच्या वाहनांच्या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता आणखी बळावली आहे. आता या गंभीर प्रश्नांकडे संबंधित विभाग काय कार्यवाही करते हे बघणं औचित्याचं ठरेल.