वि. मा. ताजने, वणी: विधानसभे करिता इच्छुकांनी नामांकन दाखल केले,. यात काँग्रेसचे वामनराव कासावार, भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राजू उंबरकर, भाकपचे अनिल घाटे, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, बसपाचे संतोष भादिकर, वंचित बहुजन आघाडी कडून डॉ. महेंद्र लोढा, अपक्ष विश्वास नांदेकर, अपक्ष संजय देरकर, अपक्ष सुनील कातकडे, अपक्ष मृत्युंजय मोरे आदींचा समावेश आहे. अर्ज छाननी नंतर ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान काँग्रेसच्या उमेदवारी करिता वामनराव कासावार, संजय देरकर यांच्यात प्रचंड चुरस झाली. मात्र कासावार यांना उमेदवारी मिळाली. भाजपच्या उमेदवारीसाठी आमदार बोदकुरवार यांच्या पुढे पक्षातीलच इच्छुकांनी कडवे आवाहन उभे केले होते. मात्र विध्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उमेदवारी खेचून आणण्यात यशस्वी झाले. मनसेकडून राजू उंबरकर यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली.
राष्ट्रवादी कडून डॉ. महेंद्र लोढा यांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र आघाडीच्या वाटपात वणीची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे डॉ. लोढा यांचा प्रचंड हिरमोड झाला. अखेरीस डॉ. महेंद्र लोढा यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उभे राहण्याचा निर्णय घेतला. तर शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर, सुनिल कातकडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. काहींनी शक्तिप्रदर्शन करीत तर काही उमेदवारांनी गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला पसंती दिली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post