‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी हॅन्ड वॉश केंद्र उभारा
सीएसआर फंडातून उपाययोजना करण्याची मागणी
सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खासगी कंपनी आहे. कंपनीला काही निधी (सीएसआर फंड) सामाजिक कार्यासाठी करावा लागतो. सध्या ग्रामीण भागात कोरोनाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असल्याने परिसरातील कंपन्यांनी सीएसआर फंडाचा वापर ठिकठिकाणी हँडवॉश केंद्र उभारून करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार व कंपनी व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे.
सध्या झरी तालुक्यात सूर्या सेम , इस्पात, टॉपपवर्थ मेटल इ. खासगी कंपन्यांसह अनेक छोट्या खासगी कंपनी सुरू आहेत. इथे अडेगाव परिसरातील मुकुटबन,खडकी,खातेरा,गणेशपूर नेरड पुरड तेजापूर कोसारा तसेच सभोवतालच्या परीसरातोल तरुण काम करीत असून त्यांच्यामध्ये कोरोनाची दहशत माजलेली आहे. कंपनीच्या सीएसआर फंडमधून अडेगाव, मुकुटबन, मांगली, मार्की, भेंडाळा, गणेशपूर, खड़की, खातेरा येडशी इत्यादी गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हॅऩ्डवॉश केंद्र उभारावी अशी मागणी केली आहे.
झरी -जामनी तालुक्यात अनेक छोटे मोठया कंपन्या आहेत. या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील तसेच स्थानिक युवक कामाला आहेत. तसेच ट्रांसपोर्ट साठी अनेक ट्रक चालक ये जा करत असतात. मात्र त्यांच्या तपासणीची इथे कोणतीही व्यवस्था नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांचे येणे जाणे सुरू असते. त्यामुळे परिसरातील खेड्यापाड्यात हॅन्डवॉश केंद्र उभारण्याची गरज असल्याची माहिती मंगेश पाचभाई यांनी दिली.