सुशील ओझा, झरी: देशासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची दहशत पसरली आहे.जनतेला कोरोना विषाणूची लागण होऊ नये याकरीता सरकारने जिल्हाबंदी तसेच जमावबंदी व संचारबंदी लागू केल्याने रोजमजुरी हमाली करणाऱ्या लोकांचे हाल होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरीब जनतेचे संपूर्ण काम बंद पडल्याने दररोजची आवक बंद झाली आहे. ज्यामुळे कुटुंबातील लहान मुळापासून वयोवृद्ध आई वडिलांचे पालन पोषण करणे कठीण झाल्याचे दिसत आहे.
व्यापारी लाईन वरील ट्रान्सपोर्ट चे मोठे वाहने बंद झाली आहे तर शेतातील कामे सुद्धा बंद झाल्याने हमाल व रोजमजुरी करणार्याच्या हातातील कामे बंद झाल्याने तसेच मालवाहू गाड्या ऑटोरिक्षा बंद झाले तसेच बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असल्यामुळे हजारो लोकांच्या हातातील कामे गेली आहे. तालुक्यातील हजारो मजूरांचे काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना काढावी अशी मागणी आता होत आहे.