संचारबंदीत सेवा देणा-या कर्मचा-यांना ‘अरेनिकम’चे ड्रॉप्स
या 'तीन' डॉक्टरांची सेवा ठरतये कौतुकाचा विषय
निकेश जिलठे, वणी: भर दिवसा रस्ते सुनसान झालेले… जो मुख्य चौकही मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो तो ही भर दुपारी निर्मनुष्य…. रस्त्यावर केवळ मास्क बांधून आणि हातात काठी घेऊन पोलिसांचा वावर… अशाच एका वेळी एका मुख्य चौकात डॉक्टर पोहोचतात आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी एक औषधी देतात. भर संचारबंदीतही या समाज रक्षकांना सेवा देणारे हे डॉक्टर आहेत. डॉ. अरुण विधाते, डॉ. विवेक गोफणे आणि डॉ. नईम शेख. या डॉक्टरांनी संचारबंदीतही कर्तव्यावर असलेल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी एक छोटे पण कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
सध्या वणी कोरोनामुळे लावलेल्या संचारबंदीमुळे थांबली असली तरी प्रशासकीय कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस प्रशासन इत्यादी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दिवस रात्र सेवा देत आहे. गर्दी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल आणि शासकीय विभाग जोमाने कार्य करीत आहे. तर वणीमध्ये सुमारे 250 लोक परराज्य, परदेशातून व परजिल्ह्यातून आलेले आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी व आपतकालीन स्थिती उद्भवल्यास वैद्यकीय सेवा तत्पर आहे.
हे सर्व सेवा देत आहेत मात्र त्यांनाही सध्या सुरक्षेची गरज आहे. आयुष मंत्रालयाने नुकतेच अरेनिकम अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधाचा कोरोना संदर्भात उपयोग करता येत असल्याचे जाहीर केले. ही एक क्लासिकल औषधी असून कोरोनामध्ये जी प्राथमिक लक्षणं दिसतात जसे सर्दी, खोकला, अंगदुखी यात या औषधचा चांगला प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे आयुष मंत्रालयाने याचा वापर करता येऊ शकतो असे जाहीर केले होते.
वणीमध्ये गेल्या एक आठवड्यापासून डॉ. विधाते, डॉ गोफणे आणि डॉ. शेख हे आपले कर्तव्य बजावल्यानंतर जो वेळ मिळतो, त्या वेळेत सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारी आणि अधिका-यांना या औषधीचे ड्रॉप्स देत आहेत. सध्या वणीतील सर्व हॉस्पिटलच्या सर्व कर्मचारीवर्ग, शासकीय विभाग, सफाई कर्मचारी इत्यादींना या औषधीचे ड्रॉप देण्यात आले.
आज गुडीपाडव्यानिमित्त वणीतील सर्व पोलीस बांधवांना ही औषधी देण्यात आली. यासोबतच पत्रकारबांधव यांनाही ही औषधी देण्यात आली. या औषधीचे कोणतेही शुल्क न घेता ही दिली जात आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम
सध्या कोरोनावर कोणतीही लस नसल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एक उपाय आहे. यातूनच अनेक कोरोना पेशंट रिकव्हर झाले आहे. अरेनिकम अलबम ही औषधी रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. त्यासोबतच या औषधीचे कोरोनाच्या प्राथमिक लेव्हलच्या रुग्णांमध्ये चांगले गुण दिसून आल्याने आम्ही ही औषधी देण्याची मोहीम सुरू केलीये. – डॉ. विवेक गोफणे
आयुष मंत्रालयाने या औषधीचा उपयोग करता येऊ शकतो असे जाहीर केल्यानंतर या औषधीचा खप अचानक वाढला आहे. मात्र वणीमध्ये ज्या डॉक्टरांकडे हा साठा होता तो एकत्र करून या औषधीचा डोस देणे सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत साठा संपणार आहे. मात्र आम्ही यवतमाळवरून विनंती करून त्याचा आणखी एक बॉक्स मागवला आहे. त्यामुळे यापुढेही काही दिवस आम्हाला ही औषधी आम्हाला देता येणार आहे. अशी माहिती डॉ. विधाते आणि शेख यांनी वणी बहुगुणीला दिले. सध्या या तिन्ही डॉक्टरांचे वणीमध्ये कौतुक होत आहे.