सॅनिटायझर मिळे ना… दारू ऑन डिमांड…

बार व देशी दारू दुकानांना सील लावण्याचे आदेशच नाही

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूमुळे राज्यात तसेच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रकारची दारू विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन वणी शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बेकायदेशीर इंग्रजी, देशी व गावठी दारुची राजरोसपणे विक्री होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वणी शहर व ग्रामीण भागात 57 बार व रेस्टॉरंट तर 17 परवाना धारक देशी दारूची दुकाने आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे दि. 14 मार्च 2020 च्या आदेशान्वये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वणी कार्यालयाकडून शहर व ग्रामीण भागातील बियरबार व परवानाधारक देशी दारूच्या दुकानांना सील ठोकण्याची कार्यवाही करण्यात करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक बार व दारूच्या दुकानातून छुप्या मार्गाने दारू काढून चढ्या दराने विकली जात आहे.

संचारबंदी लागू झाल्यानंतर पोलिसांकडून अवैध दारू विक्री व वाहतुक संदर्भात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र राज्य उत्पादन विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी अजून ही झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसत आहे. शहरात रंगनाथ नगर, पंचशील चौक, दीपक टॉकीज चौपाटी, दामले फैल व बामणी फाटा परिसरात दुप्पट दराने सर्रास दारू विक्री सुरू आहे तसेच काही अवैध व्यावसायिक दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन “ऑन डिमांड” दारू पुरवठा करीत असल्याची माहिती आहे.

सॅनिटायझरचा तुटवडा
कोरोना विषाणूचे प्रसार होऊ नये म्हणून वापरण्यात येणारे सॅनिटाईझर शहरातील एकही मेडिकल स्टोर्सवर उपलब्ध नाही, मात्र दारूची सगळीकडे “ऑन डिमांड” घरपोच सेवा उपलब्ध आहे.

दारू दुकानांना सील लावण्याचे आदेशच नाही
संचारबंदी काळात दि . 18 मार्च पासून मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार शहरात व ग्रामीण भागात बार व दारू दुकाने बंद करण्यात आली आहे. दुकानांना सील ठोकण्याचे आदेश नसल्यामुळे सील लावण्यात आले नाही. जिथून तक्रारी येत होत्या केवळ त्यांच्या बारलाच सिल करण्यात आले आहे. त्याची संख्या कमी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग वणी कार्यालयात मी व फक्त एक कर्मचारी आहे. अपुऱ्या मनुष्यबळ असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी धाड मारणे शक्य नाही. – : प्रवीण मोहतकर (उत्पादन शुल्क अधिकारी (प्रभारी) वणी)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.