विवेक तोटेवार, वणी: गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील रहिवासी असलेल्या एक इसमाने तलवार घेऊन यवतमाळ जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न केला. परंतु सीमेवर उभे असलेल्या पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक तलवार व 7 किलो सुपारी मिळून आली. पोलिसांनी या इसमावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सध्या संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरुवारी 14 एप्रिल रोजी अशाच प्रकारे वणी पोलीस यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर कर्तव्यावर होते. त्यांना विना तोंड बांधून एक इसम चंद्रपूर जिल्ह्यातून वणी येथे येत असताना दिसून आला. पोलिसांनी त्याचे वाहन रोखून त्याच्या वाहनांची झडती घेतली.
त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव मयूर प्रशांत वणी 24 रा भद्रावती सांगितले. झडती दरम्यान त्याच्या महिंद्रा टीयुव्हि वाहनात सात किलो खर्रासाठी वापरण्यात येणारी सुपारी व एक मॅन सहित तलवार आढळून आली. वाहन, तलवार व सुपारी याची एकूण किंमत 705200 आहे. हे मिळून आलेले सर्व सामान पोलिसांनी जप्त केले आहे.
त्याच्यावर जिल्हाधिकारी संचार व जमाबंदी आदेशाचे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन व 4/ 25 आर्मस ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर सहकलम 188, 269 भादवी सह. 51(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सहकलम 135 बी पी ऍक्ट सहकलम 50(अ)/177 एम व्ही ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, सा. पो. अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक वणी पो.स्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव जाधव व डीबी पथकाने केली.