2 हजार अन्नधान्याच्या किटवरून राजकीय ‘किटकिट’

भाजप आणि काँग्रेस श्रेयावरून आमनेसामने

0

जब्बार चीनी, वणी: परिसरात अडकलेल्या मजुर व परिसरातील गरजूंना धान्याच्या कीट नगर पालिकेच्या माध्यमातून महसूल विभागाला सुपुर्द करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आली आहे. ही किट नगर पालिकेतर्फे तयार करण्यात आल्या असून त्यात खासदारांचा कोणताही सहभागी नाही, अशी भूमिका भाजप नेत्यांतर्फे जाहीर करण्यात आली आहे. तर यात माजी खासदारांचा काहीही रोल नसताना त्याचे सर्व श्रेय माजी खासदाराला देत असल्याचा आरोप करत काँग्रेस आक्रमक झाली आहे.

वणीमध्ये बुधवारी दिनांक 22 एप्रिल रोजी कल्याण मंडपम येथील सभागृहात महसूल विभागाला जिवनावश्यक वस्तूंच्या 2 हजार किट सुपुर्द करण्यात आल्या. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व वणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरात इतर राज्यातील व बाहेर गावातील अनेक लोक अडकलेले आहेत. त्या सोबतच लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक नागरिकांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गरजूंना या किटचे महसूल विभागातर्फे वाटप केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दोन हजार किट नगरपालिकेच्या माध्यामातून तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी नगर पालिकेच्या सर्व कर्मचा-यांनी आपला दोन दिवसाचा पगार व काही कंत्राटदारांनी मदत केली. तसेच नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी यासाठी एक लाखाची मदत दिली. असे मिळून एकून 7 लाख 20 हजार रूपये गोळा झाले. या पैशातून 2 हजार किट्स नगर पालिकेनी तयार केल्या.

या किटमध्ये पाच किलो पीठ, तीन किलो तांदुळ, एक किलो तुरीची डाळ, एक किलो तेल, बिस्कीट व साबण आहे. 22 एप्रिलला कल्याण मंडपम येथे या 2 हजार किट्स आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या हस्ते प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आल्या.

खा. बाळू धानोरकर यांची प्रशासकीय अधिका-यांसोबत बैठक

अन् वाद सुरू झाला…

किट्सच्या वाटपानंतर भाजपकडून ‘नगर परिषद व हंसराज अहिर यांच्या तर्फे अडीच हजार धान्य किट वाटप’ या मथळ्याखाली प्रेस नोट काढण्यात आली. इथुनच वादाला सुरूवात झाली. यावर काँग्रेसने प्रेस नोट काढुन खासदार बाळु धानोरकर यांनी चार मिटींग घेउन सर्व महत्वपूर्ण शासकीय विभांगाना 5 हजार किट्सचे टारगेट दिले आहे. त्यात नगर पालिकेला 2 हजार किट्सचे टारगेट होते. त्यानुसार त्यांनी किट तयार केल्यात. यात इतर कुणाचा काहीही सहभाग नसून ते खासदारांच्या निर्देशानुसारच झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात कोणताही सहभाग नसताना त्याचे संपूर्ण श्रेय माजी खासदाराला देण्याचा दिखावा सुरू असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

या प्रकरणात ‘वणी बहुगुणी’ने दोन्ही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत दोन्ही बाजूशी संपर्क साधला असता आम्हाला खालील प्रतिक्रिया मिळाल्या…

किटसाठी मी स्वतः पुढाकार घेतला – तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष वणी
या किट कोणाच्याही सांगण्यानुसार तयार करण्यात आल्या नसून नगरपरिषदने स्वत:ची जबाबदारी ओळखून गरजूवंताना किट तयार करण्याचे निश्चित केले. त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला. नगर पालिका कर्मचारी व शिक्षकांसोबत याविषयी बोललो. त्यातून आम्ही देणगी गोळा केली. आम्ही माजी खा. हंसराज अहीर यांच्याशी बोललो. त्यांनी सुध्दा 500 किट देण्याची तयारी दाखवली व आम्हाला 500 किट पाठवल्या. सढळ हाताने कोणी मदत करत असेल त्यांची मदत घ्यायला आम्ही तयार आहो. संकटाच्या काळात कोणी राजकारण करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

किटचे श्रेय प्रशासनाचे – आशिष खुलसंगे, काँग्रेस (बाळू धानोरकर यांचे निकटवर्ती) 
गरजूंना धान्याच्या किटचे वाटप करण्यासंबंधी खा. बाळू धानोरकर यांनी 4 वेळा प्रशासकीय अधिका-यांची मिटिंग घेऊन सूचना केली. सुमारे 5 हजार किटचे टारगेट ठेवण्यात आले होते. यानुसार वणी विभागात नगरपालिका, महसूल, पोलीस व आरोग्य विभागाच्या माध्यमातून 5 हजार तयार झाल्या आहेत. याचं सर्व श्रेय हे प्रशासनाला जातं. तसेच या कामात खासदारांनी सर्व संबंधीत विभागांच्या अधिका-यांमध्ये समन्वय घडवून आणला, प्रशासनाचे काम व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे यात कोणत्या पक्षाने धवळाधवळ करत फक्त क्रेडिटसाठी राजकारण करू नये. ही लढाई मोठी असून आपल्या सर्वांना मिळून आणि एकमेकांच्या सहकार्याने लढायची आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.