जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ढाबा, रेस्टॉरंट चालक संभ्रमात
ढाबा, रेस्टॉरंटचालकांचे तहसिलदारांना निवेदन
जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन काळात पूर्णपणे बंद करण्यात आलेले हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा व्यवसायामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यतील ढाबा, रेस्टॉरंट उघडण्याबाबत दि.1 जून 2020 रोजी जिल्हाधिकारी यांनी काढलेले परिपत्रकामुळे ढाबा व हॉटेल व्यावसायिक संभ्रमात पडले आहे. त्यामुळे वणी येथील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा चालक मालक संघटनेनी मंगळवारी तहसीलदार वणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे.
परिपत्रकात पान क्र. 1 अ-3 मध्ये रेस्टॉरंटला घरपोच अन्नपदार्थ देण्याची मुभा राहील असे नमूद केलेले आहे. तर पान क्र. 2 अ-9 वर जिल्ह्यातील सर्व धाबे बंद राहतील व पान क्र. 4-ई-17 मध्ये खाद्यगृहामधील तयार खाद्य पदार्थांची सेवा सुरू राहील असे आदेशात करण्यात आले आहे.
वरील तिन्ही वेगवेगळ्या आदेशामुळे हॉटेल व्यावसायिकांनी आपले प्रतिष्ठान सुरू करावा की नाही याबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवेदन देताना अजय धोबे, मोन्टू वाधवाणी, शंकरराव उईके, किरण बुटले, प्रशांत मोरे, अखिल सातोरकार, प्रमोद पडोळे, दीपक वाधवाणी, अयुब खान, इनायतअली व इतर धाबा व्यावसायिक उपस्थित होते.