परवाना रद्दचे आदेश धडकताच जिनिंग मालकांचे धाबे दणाणले

सीसीआय-जिनिंग वाद: सीसीआयला परवाने रद्द झाल्याची माहितीच नाही

0

जितेंद्र कोठारी, वणी: कापूस खरेदी बाबत भारतीय कपास निगम (CCI) सोबत केलेल्या कारारनाम्यातील अटी पूर्ण न केल्यामुळे वणी येथील 5 जिनिंग कारखान्याचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच या जिनिंगचा वीज पुरवठा खंडित करण्याचेही जिल्हा उपनिबंधकाचे आदेश आले आहे. आदेश धडकताच संबंधित जिनिंग संचालकांचे धाबे दणाणले आहे. परवाना रद्द होण्याच्या भीतीपोटी जिनिंग प्रबंधकांनी सीसीआयला कापूस खरेदी व प्रक्रिया करून देण्याची तयारी दर्शविली आहे. या आशयाचे पत्र वणी येथील बालाजी फायबर्स व इंदिरा कॉटन प्रा.ली. तर्फे सचिव/सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती वणी, केंद्र प्रमुख, भारतीय कपास निगम, जिल्हा उपनिबंधक यवतमाळ याना देण्यात आल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार सीसीआय व पणन महासंघाने कापूस हंगाम 2019-20 मध्ये खरेदी केलेल्या कापसावर जिनिंग व प्रेसिंग प्रक्रिया करून घेणे बाबत वणी येथील 7 जिनिंग प्रेसिंग कारखानदार सोबत करारनामे केले होते. करारनाम्यानुसार सीसीआयतर्फे कापसाची सर्व खरेदी पूर्ण होईपर्यंत जीन मालकाने आपले जीन सुरू ठेवायला पाहिजे होते. परंतु कोरोना विषाणूमुळे राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आले असता कापूस खरेदी व जिनिंग कारखाने बंद करण्यात आले होते.

स्टॉक फोटो

कापूस खरेदीचा घोळ….
सीसीआयने 20 एप्रिल पासून वणी येथील नगरवाला जिनिंग, साईकृपा कॉटजीन व मनजीत फायबर्स या तीन जिनिंग मध्ये कापूस खरेदी सुरू केली. तर दयाल जिनिंग, बालाजी जिनिंग, अहफाज कॉटन व इंदिरा कॉटजीनमध्ये खरेदी सुरू केलीच नाही. तसेच सदर जिनिंग संचालकांना खरेदी सुरू करण्याबाबत कोणतेही पत्र दिले नाही. लॉकडाउनमुळे बाहेर राज्यातील जिनिंग कामगारसुद्दा परत आपल्या गावी गेले. त्यामूळे जीन सुरू करणे शक्य झाले नाही. सीसीआयकडे सुद्दा स्टाफ कमी असल्यामुळे सर्व जिनिंगमध्ये खरेदी करणे अशक्य होते.

मात्र दि. 29 मे रोजी जिल्हा उपनिबंधक यवतमाळ यांनी सीसीआय व पणन महासंघसोबत केलेल्या कारारनाम्याचे भंग केल्याचा ठपका ठेऊन बालाजी फायबर्स, इंदिरा कॉटजीन वणी, सचिन फायबर्स शिंदोला, साईकृपा जिनिंग पुरड व अहफाज कॉटन मारेगाव यांचे परवाने रद्द करून विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश काढले. विशेष म्हणजे आदेशात नमूद मारेगाव येथील अहफाज कॉटन मध्ये 24 मे पर्यंत सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती.

स्टॉक फोटो

जिनिंग चालकांच्या मनमानीमुळे खरेदी रखडली – सचिन कुळमेथे
परवाने रद्द करण्यात आलेल्या जिनिंग चालकांनी आपले जीन सुरू केले असते तर कापूस खरेदी वेळेवर होऊ शकली असती. त्यांच्या मनमानीमुळे खरेदी रखडली आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सीसीआयच्या अकोला कार्यालयातून आलेल्या तक्रारीवरून त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. काही जिनिंग चालकांनी आपले युनिट सुरू करण्याची संमती दर्शविली आहे. मात्र पूर्ण चौकशी करूनच त्यांचे परवाने पुर्वरत केले जाईल.
– सचिन कुळमेथे: कॉपरेटीव ऑफिसर, यवतमाळ

परवाने रद्द झाल्याची माहिती नाही – अजयकुमार
सीसीआयकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वणी येथील 3 जिनिंगमध्ये खरेदी सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांनी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या संकलन केंद्राची यादी आमच्याकडून मागितली होती. खरेदी बंद असलेल्या कोणत्याही जिनिंग बाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना तक्रार केलेली नाही. वणी येथील बालाजी फायबर्स, इंदिरा कॉटजीन, सचिन फायबर्स, साईकृपा जिनिंग, व अहफाज कॉटनचे परवाना का रद्द करण्यात आले, याची माहिती नाही .
– अजयकुमार, जनरल मॅनेजर, सीसीआय अकोला विभाग

या सर्व प्रकरणात असे लक्षात येते की सीसीआयना यापुढे कापूस खरेदी करायची नाही, म्हणून आपले अपयश झाकण्यासाठी सर्व खापर जिनिंग संचालकांवर तर फोडण्याचा हा प्रयत्न नाही, असा सूर सध्या खरेदी विक्री क्षेत्रातून निघत आहे. सीसीआयने कोणत्याही प्रकारची तक्रार न करता जिल्हाधिकारीच्या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक यांनी कोणत्या कारणाने जिनिंगचे परवाने रद्द करण्याचे आदेश काढले. हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.