ओबीसींचा एल्गार, 27 टक्के आरक्षणाचा मेडीकल कोटा पूर्ववत करा
जातनिहाय जनगणना कृती समितीचे तहसिलदारांना निवेदन
जब्बार चीनी, वणी: ओबीसींचा आरक्षणाचा मेडीकल कोटा पूर्ववत करण्याची मागणी घेउन जातनिहाय जनगणना कृती समिती वणी तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षणाची तरतूद असताना 2020-21 या शैक्षणिक सत्रात केंद्रीय कोटा केवळ 3.8 टक्के आरक्षण ठेवण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारकडून ओबीसी विद्यार्र्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी 66 हजार 333 जागा आहेत. त्यामध्ये १५ टक्के जागा म्हणजे 9 हजार 950 जागा केंद्रीय कोट्यात आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वाट्याला 27 टक्के आरक्षणानुसार 2 हजार 578 जागा येणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्या वाट्याला केवळ 371 जागा म्हणजे 3.8 टक्के आरक्षण मिळाले आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांना तब्बल 7 हजार 125 जागा देण्यात आल्या आहेत. या प्रकाराने वैद्यकीय प्रवेशात ओबीसी उमेदवारांवर अन्याय झाला आहे. असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ओबीसी उमेदवारांना केवळ केंद्रीय शैक्षणिक संस्था केंद्रीय महाविद्यालयात आणि केंद्रीय विद्यापीठात 27 टक्के आरक्षण देण्यात येत आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. मात्र, त्यामध्ये उर्वरित वैद्यकीय महाविद्यालय व विद्यापीठात अनुसूचित जाती आणि जमातीप्रमाणे ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण का दिले जात नाही, ज्या ओबीसीं (OBC, VJ, NT, SBC) नी या सरकारला भरभरून मते देवून 2014 व 2019 मध्ये सत्तेवर बसविले. त्या ओबीसींच्या हक्काच्या जागा खुल्या वर्गाकडे वळवून ओबीसीं विद्यार्थ्यांना त्यांच्या मिळालेल्या संवैधानिक हक्क व अधिकारापासून वंचित ठेवून उच्चवर्गीयांचे हित जपण्याचे काम हे सरकार करीत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना मिळालेल्या 27 टक्के आरक्षणानुसार प्रवेश देवून वैद्यकिय अभ्यासक्रमाकरीता पदवी व पदव्युतर महाविद्यालयातील ओबीसीं चे कमी केलेले आरक्षण 27 टक्के प्रमाणे पुर्ववत करून ओबीसींवर होणारा अन्याय दुर करावा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलने केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर अविनाश परसावार, मोहन हरडे, गणेश पायधन, संदीप डाहुले, प्रदीप बोनगीरवार, गजानन चंदावार, पांउुरंग मोहीतकर, संदीप गोहोकार, आशिष रिंगोले, शुभम गावंडे, प्रतिक राणा, सिद्दीक रंगरेज, विलास मांडवकर ईत्यादीच्या सह्या आहेत.