‘त्या’ 32 जणांचे रिपोर्ट प्राप्त…

वणीतील कोरोनाची साखळी खंडीत?

0

जब्बार चीनी, वणी: सेवानगरमध्ये कोरोनाचा 7 वा रुग्ण आढळल्यानंतर 32 हाय रिस्क व्यक्तींना कॉरेन्टाईन करण्यात आले होते. या 32 जणांचेही स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे वणीकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मात्र सोमवारी आणखी 11 स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट अद्याप बाकी असल्याने ही सातव्या रुग्णापासून तयार झालेली साखळी खंडीत झाली की नाही हे या रिपोर्टनंतरच कळू शकेल. सध्या
46 व्यक्ती कॉरन्टाईन आहेत.

सेवानगरमध्ये सातवा रुग्ण सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सेवानगर हा दाटीवाटीचा व स्लम परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शहरात चांगलेच चिंतेचे वातावरण पसरले होते. दरम्यान याचा संदर्भ घेऊन जनता कर्फ्यूचेही वणीत आयोजन करण्यात आले होते. मात्र आता 32 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर वणीकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आता उर्वरित 11 रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘त्या’ संशयीताचा रिपोर्ट अद्याप बाकी…
वणीतील गोरक्षण जवळील हनुमान नगर परिसरात काही दिवसांआधी एक व्यक्ती मुंबईहून आली होती. त्या व्यक्तीचा प्रकृती ठिक वाटत नसल्याने ती व्यक्ती स्वत:हून तपासणीसाठी गेली होती. त्या व्यक्तीने कोरोना संसर्ग असल्याचा संशय असल्याचे सांगून तो विलगीकरण कक्षात दाखल झाला होता. त्या व्यक्तीचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. मात्र त्या संशयीत सध्या ठिक असल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीबाबत वणीत अनेक अफवांना पेव फुटले होते.

आता जनता कर्फ्यूची धास्ती…
खबरदारी म्हणून वणीत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. पाच दिवसांच्या कर्फ्यूमुळे रविवारीच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे वणीकरांनी मार्केटमध्ये एकच गर्दी केली. भाजी मार्केट, आठवडी बाजार, मुख्य मार्केट, किराणा दुकान, वाईन शॉप इत्यादी जागी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. आता अधिकाधिक रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्याने दिलासादायक मिळत आहे, मात्र रविवारी जो सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला त्याने वणीकरांची काही प्रमाणात चिंता वाढवली आहे.

शासकीय कार्यालयातच नियमांची पायमल्ली?
सध्या शासकीय कार्यालयातील कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात व्यग्र आहेत. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कार्यरत असलेल्या या कर्मचा-यांच्या कार्यालयातच कोरोनासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचं योग्य प्रकारे पालन होत नसल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे कार्यालय दिवसातून तीन वेळा सॅनिटाईज करणे गरजेचे असताना ते दिवसातून एकही वेळा सॅनिटाईज होत नसल्याची माहिती आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.