विवेक तोटेवार, वणी: अद्यापही तालुक्यातील रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. याचाच फायदा घेत रेती तस्कर भुरकी येथून रेती चोरून ते एका रेती तस्कराच्या शेतात साठवणूक करून ठेवत असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे हा अवैध रेतीसाठा लक्षात येऊ नये म्हणून हा रेतीसाठा झाकून ठेवण्यात आला असून या साठ्याची राखण करण्यासाठी चक्क कुत्र्यांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात महसूलचे काही कर्मचारी गुंतल्याचा आरोप होत असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
तालुक्यात अजूनही रेतीघाटाचा अद्याप लिलाव झालेला नाही. त्यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत आहेत. सध्या भुरकी घाटावर रेती चोरीला चांगलाच उत आला आहे. ही रेती भुरकी येथील घाटावरून रात्रीच्या अंधारात काढल्या जाते. ती चोरी केलेली रेती तस्करी करणाऱ्याच्या शेतात साठवून ठेवण्यात येते. ही रेती एका मोठया फाडीने कुणाच्याही नजरेत येऊ नये अशी ठेवण्यात येते. याच्या रक्षणासाठी कुत्र्यांचा पहारा ठेवण्यात येते आहे.
एकावर कारवाई तर दुस-याला अभय
एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार इथे सध्या रेती तस्करीबाबत कॉम्पिटिशन सुरू आहे. परिसरात एका दुस-या व्यक्तीने तस्करीचे काम सुरू केल्यावर त्या तस्कराचे दोन वाहने महसूल विभागाने रात्रभर जागून पकडले. त्याच्यावर दंडही आकाराला. परंतू एकावर कारवाई करून दुस-याला मात्र अभय देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तस्करीला एका ‘बंडल’ अधिका-याचे अभय असून ‘बंडल’च्या हव्यासापोटी शासनाच्या महसूल बुडवला जात असल्याचा आरोप होत आहे.
तस्करांना काही कर्मचा-यांचे अभय – कॉ. दिलिप परचाके
भुरकी घाटावरून मानगाव मार्गे रेतीची अवैध तस्करी दिवसरात्र सुरू आहे. काही प्रशासकीय कर्मचा-यांचे अभय असल्याशिवाय ही तस्करी राजरोसपणे सुरू राहणे शक्यच नाही. या चोरीमुळे शासनाचा महसूल तर बुडतच आहे. शिवाय पर्यावरणाचे नुकसान होत आहे. या संदर्भात प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे गरजेच आहे.
– – कॉ. दिलिप परचाके