विवेक तोटेवार, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील गोडगाव ते सुकनेगाव येथील रस्त्याचे काम झाले नाही. त्यामुळे वणी जाण्याचा शॉटकट नसल्याने ग्रामस्थांना 9 ते 10 किलोमीटर चा अधिक प्रवास करून जावे लागते. या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी गोडगाव वासियांनी निवेदन देऊन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे केली आहे.
गोडगाव ते सुकनेगाव हा चार किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून बनलेला नाही. सदर रस्त्याची निर्मिती ही 1975 ते 1980 या दरम्यान च्या काळात झाली होती. तेव्हापासुन ते आजपर्यत या रस्ताचे खडिकरण किंवा डांबरिकरण झाले नाही. या रस्त्यावरच सुकनेगाव येथील सुखाई मातेचे मंदिर तर ईजासन (गोडगाव) येथील भवानी मातेचे मंदिर आहे. त्यापैकी ईजासन येथील मंदिर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
या मंदिरात महाराष्ट्र आंध्रप्रदेश या मध्यप्रदेश इत्यादी राज्यातुन भाविक दर्शानाला येतात. तसेच गोडगाव व ईजासन येथील नागरिकांना वणी ही मुख्य बाजार पेठ असल्याने कोणत्याही कामाकरिता वणीला जावे लागते. तर इजासन, गोडगाव, परसोडा, साखर येथील विद्यार्थी शिक्षणासाठी वणी येथे जातात. त्यांना हा रस्ता नसल्याने त्रास व वेळ दोन्ही खर्ची पडतात.
त्यांना सध्या गोडगाव, परसोडा फाटा, कायर, वणी असा 28 किलोमीटर चा प्रवास करावा लागतो. त्यातच त्यांना ऑटो बदलवित व काही वेळा पायदळ प्रवास करीत जावे लागते. परंतु जर रस्त्याचे काम झाल्यास त्यांना सरळ सुकनेगाव, मोहूर्ली ते वणी अशा शॉर्टकट रस्ता मिळेल.
हा रस्ता झाल्यास वेळ, पैसा तसेच 8 ते 10 किलोमीटर चे अंतर कमी होईल. शेतकऱ्यांना आपलं माळ विक्रीकरिता नेणे सोपे होईल या दृष्टीकोनातून हा रस्ता बनणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे गोडगाव ग्रामस्थांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे. निवेदन देताना युवा कार्यकर्ते पवन गोवारदीपे, संकेत मोहित, गणेश धोट, सुनील शेळकी उपस्थित होते