शिंदोलाजवळच्या हनुमाननगरात अवैध दारू विक्री

सणासुदीच्या काळात दारू विक्री जोमात

0

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या हनुमान नगरात अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री सुरू आहे, या दारूमुळे सणासुदीच्या काळात भांडणतंट्याला जोर चढतो. परिणामी गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजु गोरे यांनी करत, ही दारू विक्री त्वरित बंद करावी अशी मागणी केली आहे.

शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या हनुमानगर येथे अनेक वर्षांपासून अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे. यामुळे परिसरातील मद्यपी दारू पिण्यासाठी इथे येतात. सणासुदीच्या काळात तर या दारू विक्रीला अधिकच जोर चढलेला असतो. विक्रेत्यांमध्ये स्पर्धा चाललेली दिसून येते. ग्रामस्थांनी दारूबंदीची मागणी करताच पोलीसांकडून थातूरमातूर कार्यवाही केली जाते.

गावात ठिकठिकाणी दारुच्या बाटलांचा असा खच दिसून येतो

किराणा दुकान, पानटपरीवर दारू सहज उपलब्ध होते. परिणामी दारुड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय मुले, अल्पवयीन मजूरांची मुले दारुच्या आहारी जात आहे. अनेकांचे सुखी संसार उध्वस्त होत आहेत. यापूर्वी महिलानी अनेकदा दारू विक्रेत्यास पकडून पोलीसाच्या हवाली केले होते.

(Video: पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जप्त केला अवैध दारूसाठा)

कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने अनेक तरुण या व्यवसायाला पसंती देताना दिसून येते. दारुविक्रीमुळे गावाच्या विकास कामात अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप आहे. गाव आणि परिसरात शांतता राहण्याच्या दृष्टीने शिरपूर पोलिसांनी दारू विक्रीला प्रतिबंध घालावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजू गोरे यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.