मारेगावात पावसाचा कहर, अनेक घरांमध्ये शिरले पाणी

रात्र काढली जागून, नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार समोर

0

नागेश रायपुरे, मारेगाव: रविवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मारेगावात मुसळधार पाऊस आला. या पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले. यात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मारेगाव शहरातील अनेक प्रभागातील नाल्याची सफाई गेल्या अनेक महिन्या पासून झाली नसल्याने नाल्या चोकअप होऊन हे पावसाचे पाणी लोकांच्या घरी शिरले. मुसळधार पावसामुळे नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

यामध्ये प्रभाग क्र.10 मधील भाऊराव नेहारे, प्रभाकर मोगरे, गफ्फार कुरेशी तसेच प्रभाग क्र. 4 मधील भाऊराव भोयर, प्रभाग क्र.7 मधील सुरेश बुजाडे, शंकर मांढरे, लता बुजाडे आदींच्या घरात पाणी शिरून घरातील अन्न धान्य, कपडे, आदी नुकसान झाले आहे.

रात्र काढली जागून
संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले. हे पाणी टोंगळाभर होते. प्रभाग क्र 4 मधील वय वृद्ध दाम्पत्य भोयर यांना उपाशी पोटी रात्र जागून काढावी लागली. तर काहींना लहान मुलांना सोबत घेऊन शेजारी राहून रात्र काढावी लागली. नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा सामना सर्वसामान्यांना सहन करावा लागल्याने याबाबत संताप व्यक्त होत आहे.

नगर पंचायत शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याकाठी लाखों रुपये घनकचरा व्यवस्थापनावर खर्च केल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात मात्र शहरातील स्वच्छता व आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले असल्याचे या पावसामुळे उघडकीस आले आहे.

सध्या कोरोना महामारीचा सगळीकडे थैमान घातला असताना शहरातील अनेक प्रभागातील नाल्याची सफाई न झाल्याने पावसाने नाल्या तुडुंब भरून दूषित पाणी थेट घरात शिरल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यावर प्रभागातील नगरसेवकासह नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

प्रभाग क्र.10 च्या नगरसेविका उमाताई देवगडे यांनी नालीसफाईची समस्या वेळोवेळी नगर पंचायतला निदर्शनास आणून दिली होती. मात्र नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागला असा आरोप त्यांनी केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.