संगीतसूर्य केशवराव भोसले यांना नांदीतूनच आदरांजली

प्रा. डॉ. भोजराज चौधरी यांनी केला एक जगावेगळा प्रयोग

0

 

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः संगीतसूर्य केशवराव भोसले यांची 9 ऑगस्टला जयंती . यावर्षी ती सोशल मीडियावरूनच साजरी झाली. मराठा सेवा संघप्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेने हा उत्सव ऑनलाईन साजरा केला. यातील कार्यक्रमांचा एक भाग म्हणून ‘नमितो तूज केशवा’ ही नांदी प्रस्तुत झाली. संगीतगुरू प्रा. डॉ. भोजराज चौधरी यांनी यासाठी केशवरावांना समर्पित नांदी लिहिली. डॉ. चौधरी यांनीच तिला संगीत दिले आणि सहकलावंतांसह त्यांनी ती प्रस्तुत केली.

या नांदीत प्रा. डॉ. चौधरी, प्रा. एम. टी देशमुख, प्रा. डॉ. राजेश उमाळे, प्रा. डॉ. अंकुश गिरी, डॉ. कैलाश नेरकर, यशराज यावले, प्रतिभा तेटू, प्राची धोटे, डॉ. नीता पुरी, मंजूषा ठाकरे, डॉ. नयना दापूरकर, श्याम देशमुख आदी कलावंत होते. वाद्यांची साथ शीतल मांडवगडे आणि रामेश्वर काळे यांनी केली. ध्वनिमुद्रण वीरेंद्र गावंडे यांनी सांभाळलं. निवेदन क्षिप्रा मानकर यांचं होतं.  मसेसंचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी यांनी मोलााचं योगदान दिलं.

नांदीतून संगीतसूर्याचं जीवनचरित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. केशवरावांच्या कार्याचा आवाका फार मोठा होता. नांदीच्या अखेरच्या भागात ‘पढण’ आहे. यात त्यांनी द्रुतलयीत केशवरावांच्या विविध नाटकांतील विविध भूमिकांचा उल्लेख केला. डॉ. चौधरी यांनी सादर केलेली ही नांदी म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक अद्भूत प्रयोग होता. हा प्रयोग जगाच्या पाठीवर कदाचित पहिल्यांदाच झाला असावा. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने एक संस्था अथवा संघटन उभं व्हावं, ही प्रा. डॉ. सतीश पावडे यांची संकल्पना. ती पुढे साकार झाली. वर्षभर नियमित नसलेत तरी, अधूनमधून या बॅनरखाली विविध कार्यक्रम होतात.

प्रा. डॉ. भोजराज चौधरी यांनी केशवरावांच्या अभिनय आणि गायनशैलीवर विवेचन केले. प्रा. एम. टी. उपाख्य नाना देशमुख यांनी सूत्रधाराची भूमिका केली. तर गायनात प्रामुख्याने डॉ. चौधरी , प्रा. डॉ. राजेश उमाळे व यशराज यावले यांनी स्वर दिला. केशवरावांच्या जीवनातील अनेक पैलूंवर, स्वभावधर्मावर आणि प्रसंगांवर या नांदीतून भाष्य केलं. एकदा एक संस्थानिक नाटकाच्या प्रयोगाला अर्धा तास उशिरा येणार होते.

संगीतसूर्य केशवराव भोसले हे वेळेचे अगदी पक्के. त्यांना वेळेच्या बाबतीत कुठलंच कॉम्परमाईज चालत नव्हतं. आता दुहेरी अडचण येऊन ठेपली होती. नाटक तर राईट टाईम सुरूच करायचं होतं. दुसरीकडे संस्थानिकाचाही मान राखायचा होता. अगदी ठरल्यावेळी नाटकाचा पडदा उघडला. नांदीने केशवरावांनी सुरुवात केली. ती जवळपास अर्धा तास चालतच राहिली. तोपर्यंत संस्थानिक आलेत. प्रत्यक्ष नाटकाला सुरुवात झाली. संस्थानिकाचा मान राखला गेला आणि नाटकाची शिस्तही. रसिकांना बोनस म्हणून अर्धा तास केशवरावांनी गायलेली नांदी ऐकायला मिळाली, हे वेगळंच.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लोककलेतील गणाचा फॉरमॅट बदलवला. पारंपरिक गणपतीऐवजी त्यांच्या गणात भारतमाता, संत तुकोबाराय, छत्रपती शिवराय आदींना नमन होऊ लागले. हीच प्रेरणा घेत प्रा. डॉ. भोजराज चौधरी यांनी ही नांदी लिहिली. ती कोणत्याही देवदेवतेला समर्पित न करता प्रत्यक्ष संगीतसूर्यालाच अर्पित आहे.

लोकनाट्य आदींची सुरुवात गणाने होते. तशी संगीतनाटकांची सुरुवात नांदीने होते. हे रंगदेवतेला किंवा अन्य देवतांना आवाहन असते. नाट्यप्रयोग निर्विघ्नपणे पार पडावा अशा पद्धतीच्या विविध विनंती यात असतात. या नांदीत सूत्रधार असतो. ही सूत्रधाराची भूमिका नुकतीच प्रा. एम. टी. उपाख्य नाना देशमुख यांनी केली. नांदी ही एकप्रकारे नाटकाची प्रस्तावनाच असते. नांदी हा नाटकाचा आद्यस्वर असतो. नांदीबद्दल डॉ. चौधरी, प्रा. अजय महल्ले, डॉ. मुक्ता धांडे, डॉ. निखिलेश नलोडे यांनी सविस्तर माहिती दिली.

उत्तर हिंदुस्थानी रागांचा गानसमय हा निश्चित असतो. त्यातुलनेत कर्नाटकी रागांमध्ये थोडीफार सवलत मिळते. साधारणतः हमीर, खमाज, यमन, बिलावल, भुपाली, देशकार या सायंकालीन आणि कल्याण थाटातील रागांमध्ये नांदी असते. अनेकदा रागांचं मिश्रणही वापरलं जातं. नांदीला गाणारे आणि न गाणारे सर्वच कलावंत हात जोडून, रांगेत आणि शिस्तीत उपस्थित असतात. जवळपास आरतीसारखंच याचं स्वरूप असतं. परंपरेने नाटकाचा आरंभ नांदीने होतो. यात शक्यतो नाट्यदेवता म्हणून शिवाची आराधना होते. ती परंपरा डॉ. चौधरी यांनी कायम राखली.

डॉ. चौधरी यांनी लिहिलेल्या नांदीसाठी शंकरा, हंसध्वनी, हिंडोल आणि यमन या रागांचा वापर केला. ‘शंभोहर, गंगाधर, गिरिजा, गणराजा नमितो तूज केषवा’ हे धृवपद त्यांनी घेतलं. यातील ‘नमितो तूज केशवा’ हे पालूपद शेवटपर्यंत कायम आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांना रंगदेवतेचा आशीर्वाद मिळाला. ही रंगदेवता त्रिशूलधारी शिव आहेत. त्यासोबतच गानदेवता ही केशवरावांवर प्रसन्न आहे. अशा केशवाला नमस्कार करतो.

रंगदेवतेचे तूज आशीष त्रिशूलधराचे तुला शिवाशीष
गानदेवता प्रसन्न तुजला, नमितो तूज केशवा ।।1।।

संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या गायनशैलीचं वर्णन डॉ. चौधरी करतात. केशवराव पांढरी पाचमध्ये गायचेत. त्यांच्या आवाजाची रेंज खूप हाय होती. त्यांचा पहाडी आवाज हा गगनभेदी होता. ते रंगभूमीचे धैर्यधर अर्जुन आहेत हा आशय दुसऱ्या कडव्यात येतो.

उंच स्वरांचे तुझेच गायन, कंठ पहाडी गगन भेदून
रंगभूमीचा धैर्यधर अर्जून, नमितो तूज केशवा ।।2।।

केशवरावांनी रंगभूमीत अनेक नव्या सुधारणा केल्यात. नवनवे प्रयोग केलेत. मखमली पडद्यापासून रंगभूमीवर अनेक वस्तू त्यांनी आणल्यात. कलावंत, व्यावसायिक याही भूमिकेच्या पलीकडे ते देशप्रेमी होते. डायरेक्ट-इनडायरेक्ट त्यांनी अनेक देशभक्तांना सहकार्य केलं. महात्मा गांधींच्या आवाहनानुसार स्वराज्य फंड उभारला गेला. त्यासाठी त्यांनी बालगंधर्वांसोबत संयुक्त प्रयोग केलेत. स्वात्रंत्र्य आंदोलनाला आर्थिक मदत केली. कोल्हापुरातल्या तालमी म्हणजेच आखाडे, विद्यार्थी तसेच अनेकांना त्यांनी मदत केली. नाटकाच्या तंत्रात त्यांनी त्या काळात नवनवी संशोधनं केलीत. केशवराव नेहमीच क्रिएटिव्ह राहिलेत.

रंगभूमीचा तू उद्धारक, राष्ट्रभक्तीने होता प्रेरीत
दानधर्मी तू नवसंशोधक, नमितो तूज केशवा ।।3।।

CamScanner 07-01-2020 14.58.21

तेव्हाच्या काळाची मर्यादा होती त्यामुळे स्त्रिया नाटकात भूमिका करत नव्हत्या. तरीदेखील केशवरावांनी आपल्या नाटकांतून स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडल्यात. बालविवाह, हुंडा, शोषण आदी अनिष्ट रूढी आणि परंपरांवर त्यांनी प्रहार केलेत. देशभक्त आणि समाजक्रांतिकारक म्हणून त्यांची सूक्ष्म भूमिका सदैव कायम होती.

स्त्रिसन्मान अन् उचनिचता, भेद कधी ना मनीही धरता
देशभिमानी कलाउपासक, नमितो तूज केशवा ।।4।।

तेव्हाची नाटकं आणि नाटककंपन्या ह्या राजाश्रयाखाली काम करीत. केशवरावांनी नेहमीच लोकाश्रयाला प्राधान्य दिलं. त्यांनी अनेक संस्थानिकांचे प्रस्ताव नाकारलेत. ग्वाल्हेरच्या संस्थानिकांसह अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यांनी राजदरबाराचा कधीच मोह धरला नाही. सामान्य नाट्यरसिकही त्यांच्यासाठी राजाच होता. यावर डॉ. चौधरी म्हणतात,

दरबाराचा मोह नसे तूज, नाट्यकर्मी तू हेच तुझे व्रत
सप्तस्वरांचे तुला स्वराशीष, नमितो तूज केशवा ।।5।

संगीतसूर्यांच्या गायनाला धार होती. सर्वसामान्यांपेक्षा ते उंच स्वरात गायचे. त्यांच्या स्वरांत सूर्याचे तेज होते. त्यामुळेच तेव्हाच्या एका पत्रकाराने त्यांना संगीतसूर्य म्हणून गौरविले. अ, उ, म म्हणजे रज तम आणि सत्व गुणाचं विचारवर्णन. म हा औष्ठ्य वर्ण आहे. म उच्चारानंतर ओठ बंद होतात. तरीदेखील त्यामागील नाद निर्गुण स्वरूपात सुरूच राहतो. असं ओंकाराचं विश्लेषण प्रा. डॉ. स्वानंद पुंड करतात. त्याचप्रमाणे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्वरांचा किंवा अभिनयाचा नाद हा रसिकमनात कायम दरवळत राहायचा. त्यामुळेच ते रसिकांच्या गळ्यातले ताईत झालेत. रसिकांच्या कंठातले कौस्तुभमणी झालेत.

संगीतसूर्य तू रंगभूमिचा, प्रसाद तुजला ओंकाराचा
कंठी कौस्तुभमणी रसिकांचा, नमितो तूज केशवा ।।6।।

या नांदीतील डॉ. चौधरी यांनी केलेला पुढील प्रयोग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला संगीतात ‘पढण’ म्हणतात. हे रॅपीड साँगच असतं. यात डॉ. चौधरी यांनी केशवरावांनी केलेल्या धैर्यधर, अर्जुन, आदी भूमिकांचा उल्लेख केला आहे.

रंगभूमीचा तूच धैर्यधर, गोपिचंद, समषेर बहाद्दर
तूच अर्जुन, भारत, शंबुक, तूच सुभद्रा, शाहू, नारद
शहा, शिवाजी, तूच धुरंधर अभिनय गायन तुझेच सुंदर
तुझी शारदा रसिक शिरावर, कृपा तुझ्यावर ठेवी नटेश्वर
नमितो तूज केशवा

संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जीवनपट अगदी काही कडव्यांतून मांडण्याचा डॉ. चौधरी यांचा प्रयत्न हा कौतुकास्पदच आहे. त्यांनी केशवरावांवर अत्यंत समृद्ध अशी ही नांदी लिहिली. अगदी अलीकडच्या काळातली ही संगीतनाटकांना मिळालेली खूप मोठी देण आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

 

Leave A Reply

Your email address will not be published.