सोपानदेवा ओवाळी खेचरू विसा जिवींचिया जीवा’

आज संत विसोबा खेचर महाराजांची पुण्यतिथी आणि संत ज्ञानदेवांची जयंती

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या कथानकांमध्ये विसोबा हे सुरुवातीला व्हिलनम्हणूनच येतात. मांड्यांचा चमत्कार पाहिल्यावर ते या भावंडांचं मोठेपण जाणतात. संतांच्या मांदियाळीत येतात. ते या भावंडांच्या प्रेमात पडतात. याही पुढे जाऊन ते ’’सोपानदेवा ओवाळी खेचरू विसा जिवींचिया जीवा’ ही संत सोपानदेवांची चक्क आरती लिहितात. हे संत विसोबा खेचर वारकरी धर्माच्या बांधणीतले महत्त्वाचे समन्वयक असावेत. श्रावण कृष्ण अष्टमी हा संत विसोबांचा स्मृतिदिन तर संत ज्ञानदेवांची जयंती. हा काळ अर्थातच भिन्न आहे.

संत विसोबा खेचर तत्त्वज्ञ आणि सिनियर होते. लिंगायत धर्माचा त्यांचा अभ्यास होता. त्यांनी ’’शडुस्थळी’ हा ग्रंथदेखील लिहिला. रा. चि. ढेरे यांनी हा ग्रंथ शोधला. यांच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा आणि अनुभवांचा वारकरी धर्माच्या बांधणीत नक्कीच उपयोग झाला असावा. लिंगायत धर्मातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्त्वाचं तत्त्वज्ञानदेखील त्यांच्यामुळे वारकरी धर्मात बळकट झालं असावं.

संत ज्ञानदेवाला मुक्ताईला करावयाच्या मांड्यासाठी खापर म्हणजेच मातीचं भांडं आणायचं असतं. ते मिळत नाही. किंबहुना ते मिळू देत नाही. यावेळी योगसामर्थ्यानं ज्ञानदेव आपली पाठ तापवतात. त्यावर मुक्ताई मांडे करते. हा चमत्कार पाहून विसोबा खेचर या भावंडांना शरण जातो. आतापर्यंत व्हिलन असलेले विसोबा एकदम कॅरेक्टर रोलमध्ये येतात.

या आणि अशा अनेक कहाण्यांतून विसोबा वारंवार येतात. तरीदेखील विसोबांच्या पूर्वायुष्यावर किंवा जीवनचरित्रावर समकालीन अथवा नंतरच्याही संतांनी चर्चा केली नाही. संत चरित्राचं डॉक्युमेंटेशन करणाऱ्या संत नामदेवांच्या गाथेतही विसोबांचे डिटेल्स मिळत नाहीत. त्याचं चित्रदेखील पहिल्यांदाच रिंगणच्या संत विसोबा खेचर विशेषांकासाठी नेदरलॅंडयेथील कलावंत भास्कर हांडे आणि पुण्यातील एका चित्रकाराने काढलं.

खेचर या शब्दाचे अनेक अर्थ अॅड. देवदत्त परुळेकर आणि अन्य लेखकांनी ‘रिंगण’च्या संत विसोबा खेचर विशेषांकात सांगितलेत. खेचर म्हणजे योगी, भूत-पिशाच्च, यती, योगी, आकाशात उडणारे, वावरणारे पक्षी, ग्रह, तारे, नक्षत्रं एवढंच नव्हे तर घोडा आणि गाढव यांची संतती असेही अर्थ खेचर या शब्दाचे सांगितले जातात.

’’खेचर म्हणजे आकाशात उडणारा. जगातली कोणतीच गोष्ट विसोबांना बांधू शकत नाही. ते खऱ्या अर्थानं मोकळे होते. स्वतंत्र होते. खऱ्या विवेकाचा सल्ला फक्त त्यांच्याकडूनच मिळणार होता.’’ याच शब्दात रिंगणचे संपादक सचिन परब यांनी संत विसोबा खेचर यांचा गौरव केला.

संत विसोबा खेचर यांचं नाव विश्वनाथ स्वामी असल्याचं लेखक चन्नवीर भद्रेश्वरमठ  सांगतात. विसोबा हे सोनार आणि सावकार असल्याचं औंढा गावातील जुनी माणसं सांगतात. संत नामदेव महाराजांची आणि संत विसोबा खेचरांची पहिली भेट याच औंढ्याच्या नागनाथ मंदिरात झाली. विसोबा चाटी असाही त्यांचा अनेकदा उल्लेख होतो. चाटी म्हणजे कापडाचे व्यापारी. प्रपंच आणि परमार्थाची सांगड विसोबांच्या आयुष्यात असावी असा अंदाज लावता येतो.

विसोबा आणि ज्ञानदेवांचं नातं पुढे खूप बळकट झालं. या भावंडाना गुरूस्थानी मानत कधी सोपानदेव तर कधी मुक्ताई त्यांच्या गुरू म्हणून येतात. एवढंच नव्हे तर संत सोपानदेवांवर विसोबा आरती लिहितात. ल. रा. पांगारकर यांनी या आरतीचा उल्लेख केला. संत नामदेव आणि इतर संतांची तीर्थयात्रा झाली. यातही कदाचित विसोबा असावेत.

संत नामदेव महाराजांना मार्गदर्शक म्हणून विसोबा खेचर सर्वांगानी परिपूर्ण वाटलेत. ते संत नामदेव महाराजांचे गुरू, गाईड आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई, समकालीन संत ही सगळी मांदियाळी वारकरी धर्माचं डिझाईन करत होते. त्यावर प्रत्यक्ष काम करत होते. यात संत विसोबांचा असलेला अत्यंत महत्वाचा रोल लक्षात घेणं गरजेचं आहे. वारकरी चळवळीच्या पायव्यातली एक वीट संत विसोबा खेचर यांचीदेखील आहे.

आज औंढा येथे संत विसोबा खेचर यांचं मंदिर आहे. बार्शी येथे समाधी असल्याचं सांगितलं जातं. संत विसोबा खेचरांकडू संत नामदेव महाराजांना बरंच काही मिळालं. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा लाभ समकालीन संतांना व संतप्रेमींना मिळाला असावा. वारकरी आणि लिंगायत या दोन्ही परंपरेतून त्यांचा अभ्यास आणि संशोधन होणं आवश्यक आहे. संत ज्ञानदेवांची जयंती आणि संत विसोबांची पुण्यतिथी मंगळवारी आहे. या दोन्ही सत्पुरुषांना विनम्र अभिवादन.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.