सुशील ओझा, झरी: वणी-मुकुटबन मुख्य मार्गावर बाजारपेठ असून या मार्गावरील अनेक दुकानदार बस स्थानकावर व जवळ असलेल्या घरातून खुलेआम गॅस विक्री करीत आहेत. अवैध गॅस विक्रेता हे वेगवेगल्या बोगस नावाने सिलिंडरची खरेदी ८७० रूपयांत करून १३०० रूपयांत विक्री करतात. एका सिलिंडरमागे ५०० ते ६०० रूपये नफा कमवून महिन्याकाठी लाखो रूपये करीत आहेत. मुकुटबन येथून दर महिन्याला ४०० ते ५०० सिलिंडरची अवैध विक्री केली जात आहे.
तालुक्यातील मुकुटबन, पाटण आणि झरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब जनतेची जास्त दराने सिलिंडर गॅसची विक्री करून जनतेची लूट होत आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठी वरील तिन्ही गावांत आहेत. सभोवतालच्या परिसरातील १००च्या वर गावांचा सबंध तिन्ही गावांतील बाजारपेठींमुळे येतो. तालुक्यात मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून मुकुटबनसह परिसरात अधिकृत हजारो गॅस सिलिंडरधारक आहेत. तर शेकडो अनधिकृत गॅस सिलिंडरधारकसुद्धा आहेत. मुकुटबन येथे काही दुकानदार अवैधरीत्या गॅस विक्री करीत आहेत.
गॅस सिलिंडर विक्रेते हे अधिकृत विक्रेते नसून त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नाही. मुकुटबन येथे ४ ते ५ अवैध सिलिंडर विक्रेते असून या विक्रेत्यांमुळे बसस्टँड व गावातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सिलिंडर गॅसच्या अधिकृत विक्रेत्यांना गावाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी गोडाऊन बनवावे.
गॅस सिलिंडरचा साठा सुरक्षित ठेवावा लागतो. जेणेकरून कोणताही अपघात झाल्यास जीवितहानी होऊ नये. परंतु अवैध गॅसविक्री करणाऱ्याजवळ कोणतेही गोडाऊन नाही. ज्यामुळे हे विक्रेते आपल्या दुकानात व घरी साठवून ठेवत आहेत. ज्वलनशील व स्फोटक वस्तू असलेल्या सिलिंडरला घरी ठेवून कुटुंबासह गावकरी व दुकानात ठेवून ग्राहक आणि आम जनतेच्या जीवाशी खेळण्याचे काम अवैध गॅस सिलिंडरविक्रेते करीत आहे. हा प्रकार पाटण व झरी येथेसुद्धा सुरू आहे.
या सर्व गोष्टींची माहिती पोलीस व महसूल विभागांना असूनसुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. तरी संबंधित विभागांनी अवैध गॅससिलिंडर विक्री करून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर त्वरित कठोर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.