फक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा
विदर्भातल्या 'या' राजघराण्याने सरू केली ही परंपरा
शेती हा एक प्रमुख व्यवसाय होता. शेतकरी तन, मन, धनाने समर्पित होऊन शेतात आपले श्रम व समाधान रुजवत होते. शेती श्रेष्ठच होती त्या काळी. या देशात अनेक उत्सव पिकांसारखे शेतीतूनच फुललेत. मोठी माणसं जीव लावायची मातीला. शेतीशी जुळलेले सर्वच घटक त्यांचे जीव की प्राण असायचे. त्यातील एक म्हणजे बैल. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सणदेखील याच शेतीपरंपरेतूनच आलेला.
रघुजी राजे भोसले द्वितीय हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते. नव्या पिढ्यांना शेती व शेतीशी जुळलेले बैल यांच्याप्रती आस्था व रुची वाढावी म्हणून त्यांनी 1806 मध्ये तान्हा पोळा सुरू केला. श्रावण अमावस्येला महाराष्ट्रात पोळा साजरा होतो. भारतभर विविधपद्धतीने शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीतच असतात.
नागपूरातील तेव्हाचे काष्ठशिल्पकार कायरकर यांच्याकडून खऱ्या बैलांएवढा लाकडाचा बैल त्यांनी बनवून घेतला. जसा मोठ्या बैलांना घेऊन पोळा साजरा करतात तसाच हा उत्सव त्यांनी सुरू केला. या लाकडी बैलांना चाकं लावली. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. समोर मशाली घेतलेले घोडे असायचे. अर्थात तेही लाकडाचेच.
पहिला लाकडी बैल बराच काळ उत्तम स्थितीत होता. एकदा वाड्याला आग लागली. त्या आगीत तो पहिला व अन्य लाकडी बैल जळून भस्मसात झालेत. पण एक छान माहिती मुधोजी राजेंनी दिली. ते म्हणाले की, घरात मुलगा जन्मला की त्याला त्याच्या पहिल्या पोळ्याला एक नवा लाकडी बैल मिळतो. हे पोळ्याच्या परंपरेचं हॅण्डओव्हरच असतं.
रघुजी राजे भोसले यांचे दहावे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी या परंपरेची माहिती दिली. तंजावर, सातारा, कोल्हापूर व नागपूर ह्या नागपूरच्या प्रमुख गादी. भोसले चौफेर असले तरी तान्हा पोळा मात्र केवळ नागपूरकर भोसलेच साजरा करतात. पशूप्रेमाची पूर्वापार परंपरा विद्यमान मुधोजी राजेंनी जपली. त्यांच्या संग्रहात आजही उमदे घोडे, राजहंस, विविध पक्षी, प्राणी आहेत.
सन 1806 पासून नागपूर व आता जवळपास संपूर्ण विदर्भातील काही भागांत तान्हा पोळा साजरा केला जातो. काळी व पिवळी मारबत काढली जाते. तिचादेखील एक स्वतंत्र इतिहास आहे. श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांनीदेखील ही घराण्याची परंपरा जोपासली. त्यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल जतन करून ठेवलेला आहे. त्या बैलाची उंची आठ फूट आणि लांबी सहा फूट आहे. त्या बैलाच्या पायात चांदीचे तोडे आहेत.
भोसले घराण्याने तान्ह्या पोळ्यााची परंपरा सुरू केली. तेव्हापासून काष्ठषिल्पकरांना नवा रोजगार मिळाला. लाकडापासून बैलाचे शिल्प तयार करणाऱ्या पिढ्या तयार होऊ लागल्या आहेत. लाकडाच्या एका पाटीलाच आउटलाईन देऊन व चाक बसवून सर्वात स्वस्त लाकडी बैल तयार होतो. सागवान लाकडाचा हे बैल तयार करण्यासाठी उपयोग होतो.
तान्हा पोळा विदर्भात आणि त्यातही नागपूर भागात साजरा केला जातो. आपली शेतीची, पधूधनाची असलेली बांधिलकी व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न असतो. शेती हीच एक स्वतंत्र संस्कृती आहे. याच संस्कृतीमधून बहुतांश संस्कृती उदयास आल्यात. या संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि हस्तांतरण होत आहे, ही आनंदाचीच बाब आहे.
सुनील इंदुवामन ठाकरे