ती गणपतीची मूर्ती करायची; पण बसवायची दुसऱ्यांच्या घरात
वैष्णवीच्या गणपतीची प्रतिष्ठापना आता तिच्या स्वत:च्या घरात
नागेश रायपुरे, मारेगाव: वयाच्या 11 व्या वर्षापासून ती गणपती बाप्पांच्या मातीच्या मूर्ती बनवत आहे. दरम्यान तिचे कुटुंब भाड्याने राहत असल्याने जागेअभावी गणेश चतुर्थी मध्ये ती बनवलेल्या मूर्ती घरी न बसवता दुसऱ्यांना देत होती.
आता मात्र वैष्णवीच्या वडिलांनी स्वतःचे घर बांधले. त्यामुळे या वर्षी वैष्णवीचे वडील विठ्ठराव कळसकर हे आपल्या मुलीच्या हाताने बनविलेल्या मातीच्या गणपती बापाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना करत आहे. वैष्णवीचे आई-वडील, भाऊ आणि आजीला आनंद होत आहे.
काही कला शिकता येतात. काही कला निसर्गत: असतात. त्या फक्त डेव्हलप कराव्या लागतात. यातूनच घडतो सच्च कलाकार. वयाच्या 11 व्या वर्षीच वैष्णवी विठ्ठलराव कळसकर हिच्या हाती माती आली. मूर्तीकलेचं कुठलंही प्रशिक्षण न घेता, पहिली मूर्ती तिने साकारली. हातात आलेल्या मातीचं वैष्णवीने अक्षरश: सोनं केलं. स्थानिक कलावंत वैष्णवीची कलाक्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरूच आहे.
“आवड असली की कावड मिळते” त्याचाच एक प्रत्ययाचे वात्सव दर्शन अनुभवास येते. शहरातील एका सामान्य कुटुंबातील वैष्णवी विठ्ठलराव कळसकर हिला कोणीही न शिकवता ती वयाच्या 11 व्या वर्षांपासून एखाद्या पारंपरिक मूर्तीकारांप्रमाणे आकर्षक मातीच्या गणपती बाप्पांची मूर्ती तयार करीत आहे. इतकेच नव्हे तर क्रीडाक्षेत्रासह, महापुरुषांसह देवीदेवतांचे हुबेहूब स्केच काढायची कलासुध्दा तिने स्वत: अंगीकारली आहे. .
वैष्णवी बारावीत सायन्सनंतर इंजिनिअरिंग सेकंड सेमिस्टरला राजीव गांधी कॉलेज चंद्रपूर येथे शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबतच तिला डान्स, क्रीडाक्षेत्रातही आवड आहे. वैष्णवी खो-खो, रनिंगची जिल्हास्तरीय व आंतरविद्यापीठ स्तरावरची खेळाडू आहे. वैष्णवीचे परिसरात कौतुक होत आहे.