अयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जमाव टाळण्यासाठी नगर परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. श्री गणेश मूर्ती विसर्जन करीता विविध प्रभागात व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी फिरते विसर्जन व संकलनरथ तयार करण्यात आलेत.
नुकतीच घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळांचावतीने श्रींची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या दिवसापासून घरगुती विसर्जन सुरू झाले. विसर्जनाचा वेळी नागरिकांची गर्दी होऊन कोरोनचा संसर्ग अधिक वाढू शकतो, त्यामुळे नदीवर गणपती विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली. गणपती विसर्जनासाठी नगर परिषदेच्या वतीने शहरात १५ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. सोबतच शहरात फिरते विसर्जन संकलनरथांचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली. यासाठी न. प. कर्मचाऱ्यांची व सहकार्याचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरातील न. प.ने ठरवून दिलेल्या विसर्जनस्थळांवर किंवा घरातील श्रींची मूर्ती विसर्जन संकलनरथावर विसर्जनासाठी द्यावी अशी विनंती नगराध्यक्षा वैशाली नहाते, मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार यांनी केली आहे.