सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. कोरोणामुळे सर्व परीक्षा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जेईई व नीटची प्रवेशपरीक्षाही स्थगित करण्यात यावी, अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभेचे युवक काँग्रेसचे महासचिव रोहित राऊत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले.
करोनाचे दिवसागणित गंभीर होत चाललेले संकट लक्षात घेऊन २५ लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा टांगणीला येणार असून राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) तसेच संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) स्थगित करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विद्यार्थी व पालकांचे आरोग्य हित लक्षात घेता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर जेईई व नीटची प्रवेशपरीक्षा घेण्यात याव्या, तोवर जेईई व नीट या प्रवेशपरीक्षा स्थगित करण्यात याव्या, असे रोहित राऊत यांनी यावेळी सांगितले.