वणीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2259 घरांना मान्यता
वणी नगर परिषदेमध्ये कार्यालयाचे उद्घाटन, शुक्रवार पासून नोंदणी सुरू
विवेक तोटेवार, वणी: सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे ‘प्रधानमंत्री’ आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गुरूवारी वणीत सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या योजनेच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या योजनेअंतर्गत वणी नगर परिषदेद्वारा 2259 घरे बांधून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती हंसराज अहीर यांनी दिली.
केंद्र सरकारने ‘सर्वासाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सुरू केली आहे. योजनेचा वणी नगर परिषदेच्या हद्दीतील दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांना (निम्न मध्यमवर्ग) लाभ होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शुक्रवारपासून नोंदणी सुरू होणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना नगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयात येऊन नोदणी करावी, असं आवाहन नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी केलं आहे.
सदर कार्यक्रमास वणीचे नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे हे अध्यक्ष म्हणून होते. तर उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर होते. सोबतच वणीचे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्यासह नगर परिषदेचे नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुणाला मिळणार योजनेचा लाभ, काय आहेत निकष ?
झोपडपट्टी मध्ये राहणार्यांना केंद्र सरकारकडून 1 लाख व राज्य सरकार कडून 1 लाख रुपये प्रती घरकुल रक्कम मिळणार आहे. या योजनेचा लाभ त्याच झोपडपट्टी धारकांना मिळणार आहे जे 1 जानेवारी 2000 पूर्वीचे झोपडपट्टी धारकआहे. तर जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न घटक आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये आहे, त्यांना 6.50% व्याज दराने 15 वर्षांसाठी 6 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. सदर रक्कम ही बँक व गृहनिर्माण वित्तीय संस्थाद्वारे पुरविण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून भाड्याने राहणाऱ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये केंद्र सरकारद्वारे 1.50 लाख तर राज्य सरकार द्वारे 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ज्यांना नवीन घर बांधायचे आहे किंवा असलेल्या घरात वाढ करायची आहे. त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
जरी वणीसाठी 2259 घराना मान्यता मिळाली असली तरी वणीकर जनतेला नाराज होण्याचे कारण नाही. अधिकाधिक लोकांना घरं मिळावी यासाठी आपण 5000 घरे वणीसाठी मंजूर करून आणू. सोबतच वणीच्या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना दिली.