वेडद येथे एकाच दिवशी कोरोनाचे 10 रुग्ण आढळलेत
झरी तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या झाली 41
सुशील ओझा, झरी: जिल्ह्यासह पांढरकवडा, वणी, दारव्हा येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आता झरी तालुक्यालासुद्धा कोरोनाची लागण सुरू झाली आहे. तालुक्यातील वेडद येथे एकाच दिवशी कोरोनाचे १० रुग्ण आढळल्याने गावात चांगलीच दहशत पसरली आहे.
मुकुटबन इथून १२ किमी अंतरावर कमी लोकसंख्या असलेल्या वेडद येथे गावातील एका तरुणाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. याच अनुषंगाने प्रशासनाने गावातील ५३ लोकांची कोरोना तपासणी ३१ ऑगस्टला केली. त्यात २५ लोक निगेटिव्ह आलेत तर २८ लोकांची आर्टिपीसीआर टेस्ट केली. १० लोक कोरोना पॉजिटिव्ह निघाले. यावरून तहसीलदार रामचंद्र खरेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी आपल्या ताफ्यासह वेडद गाव गाठले.
गावातील १०० मिटरचा परिसर सील केला व १० जणांना क्वारेनटाईन करण्यात आले आहे. वेडद येथील पहिला मिळालेला रुग्ण हा मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. त्या तरुणापासूनच गावात रुग्णाची संख्या वाढली असे बोलले जात आहे.
तालुक्यात सर्वप्रथम मुकुटबन येथील सिमेंट फॅक्टरीमधेच कोरोना रुग्णांची सुरवात झाली. आता वेडद येथे व हळूहळू परिसरातील अनेक गावांत रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण परिसरातील शेकडो तरुण सिमेंट कंपनीत काम करीत आहेत.
तालुक्यातील महादापूर येथे १, पाटण येथे २, मांडवी येथे १३, वेडद येथे १० व सिमेंट कंपनी येथे १४ अशी एकूण ४१ रुग्णाची संख्या आतापर्यत झाली. पुढेही कोरोना रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासनाने वेळीच योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.