जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील परसोडा येथील कोवीड केअर सेंटर मध्ये रूग्णांकरिता आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे व नवीन कोविड केंद्र सुरू करण्याबाबत वणीतील सामाजिक व राजकीय संघटनांनी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, भाकपा पक्षाच्या कार्यकर्त्यांसह वणीकर जनता उपस्थित होती.
कोरोना रूग्णांवर उपचार व समूपदेशाना करिता तालुक्यात परसोडा येथे कोवीड केअर सेंटर उघडलेले आहे. या कोविड सेंटर मध्ये पुरेशा सोई-सूविधा उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांचा प्रचंड गैरसोय होत आहे. या जागी स्वच्छतागृहासारख्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. येथे भरती असलेले रूग्ण व्हिडिओच्या माध्यमातून कोवीड केअर सेंटर मधील व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहेत.
नवीन प्रस्तावित कोविड केअर सेंटरही सुसज्ज नाही
वणी शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व भौतिक सोई सूविधा उपलब्ध असणारे नविन कोविड केअर सेंटर वणीच्या परिसरामध्ये उघडणे आवश्यक आहे. वागदरा येथील अपंग निवासी शाळेमध्ये नविन कोविड केअर सेंटर उघडणार असल्याची माहिती आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली होती. परंतु या शाळेमध्ये सुध्दा पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत अपंग निवासी शाळा नविन कोविड केअर सेंटर म्हणून निवडण्यास रूग्णांना आणखी त्याठिकाणी गैरसोईचा सामना करावा लागेल.
रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वणी शहरा बाहेरील सोई-सुविधा व संपूर्णपणे सज्ज असणाऱ्या शाळा, महाविद्यालयाच्या इमारती तसेच टाऊनशिप येथील वेकोलि गेस्ट हाऊस हा नविन कोविड केअर सेंटर करिता चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे त्यातील एक वास्तू ताब्यात घेऊन त्याठिकाणी नविन कोवीड केअर सेंटर उघडावे, अशा आशयाचे निवेदन आज दिनांक ०८ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे, भाकप नेते दिलीप परचाके, मराठा सेवा संघ तालुक्याध्यक्ष मंगेश खामनकर, अॅड. विप्लव तेलतूबंडे, अॅड. रमेश बांदूरकर, अॅड. अनिरुद्ध तपासे, अॅड. अमोल टोंगें, अॅड. शेखर वराटे, प्रविण रोगे, भाऊसाहेब आसुटकर व नागरिक उपस्थित होते.