झरी तालुक्यातील कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे तहसीलदार यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या कलावंतांनी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने तहसीलदार यांना निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तर मोठ्या उद्योगधंद्यांपासून तर लहान दुकानदारांना याची झळ पोलचली आहे. लाखो लोकांच्या हातातील कामे गेलीत व लाखो तरुण बेरोजगार झालेत.
अशाच प्रकारे तालुक्यातील लोककलावंत व वाद्यवृंद, गायक, सनई वादक, तबला वादक, नर्तक, ढोल वादक, नकलाकार व इतर कलावंतसुद्धा बेरोजगार झालेत. लग्न समारंभ, वाढदिवस, गणपती, दुर्गादेवी, मोहरम व इतर अनेक उत्सवांमध्ये बँड वाजवून कुटुंबाचे उदरनिर्वाह ते करीत होते. सर्वच सण आणि उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने कलावंतांचे मोठे नुकसान झाले. त्यांची कुटुंबे उघड्यावर येत आहेत.
आज प्रर्यंत जमा असलेल्या पुंजीवर जीवन जगणे सुरू होते. परंतु हातात कोणतेही काम नसल्याने जमा असलेली पुंजीसुद्धा संपली आहे. पुढील दिवस आपल्या कुटुंबाला घेऊन कसे काढावेत याची चिंता कलावंतांना लागली आहे. कलावंतांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २४ जून रोजी निवेदन देऊन कलावंतांना आर्थिक मदतीची मागणी केली होती. कलावंतांची यादीसुद्धा देण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक कलावंतांना प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे आर्थिक मदत करण्याचे आदेश जारी करावेत. अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे नन्नू कोडपे यांच्या पुढाकाराने देण्यात आले. त्यावेळी प्रवीण गुरनुले, यादव वाढई, कुंडलिक मेश्राम, रविराज बोरकर, नामदेव बोरकर, आकाश परचाके, पोच्चीराम उईके, हेमंत काटकर, सुरेंद्र भालेराव, रविंद्र जुमनाके, किसन कोडपे, आकाश आत्राम, सुरेंद्र उईके, गणेश गेडाम, मनोहर किनाके, वसंता दडंजे व प्रमोद कोडपे उपस्थित होते.