जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाबाधित मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आज जिथे नातेवाईक पाठ दाखवून निघून जात आहेत. अशा संकटकाळात येथील नगर परिषदचे चार कोरोनायोद्धा आपले जीव धोक्यात घालून मृतकांवर अंत्यसंस्कार करण्याचे धाडस करीत आहेत. तरीदेखील या कोविडयोद्ध्यांची दखल घेतील जात नाही. ते उपेक्षितच ठरतात.
वणी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांचा रविवारी गणेशपूर येथे घरी कोरोनामुळे मृत्यू झाला. मृतकाचा अंत्यसंस्कार वणी नगर परिषदचे चार कोरोना योद्धा अभिषेक ताराचंद, शुभम करसे, रितेश गौतम व शैलेश ब्राह्मणे यांनी पीपीई किट घालून येथील मोक्षधाममध्ये मध्ये केला.
शासनाच्या गाईड लाईननुसार कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केला जात नाही. त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. रुग्णालयातून मृतदेह पालिका पथकाच्या ताब्यात दिल्यानंतर चिता रचण्यापासून ते अग्नी देण्यापर्यंत सर्व सोपस्कार या लोकांना करावे लागतात. मृताच्या नातेवाईकांपैकी काहिंना पीपीई किट घालून मृतदेहास मुखाग्नी देण्याची मुभा आहे.
मात्र कोरोनाच्या नावाने नातेवाईक फिरकतच नाही. स्मशानभूमीत आले तरी अग्नी देण्याचे धाडस करीत नाहीत. तेव्हा कोविड योद्धा आपल्या जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. डॉक्टर, पोलिस, सफाईयंत्रणेतील कर्मचारी हे प्रत्यक्ष दिसणाऱ्यांपैकी कोविड योद्धा आहेत. मात्र पडद्यामागे राहून अत्यंत कष्टाचे काम करणारेही काही आहेत.
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे मा जोखमीचे असते. हे अत्यंत महत्त्वाचे काम करणाऱ्या नगर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या व्यथा कदाचित लोकाभिमुख झाल्याच नाहीत. आज स्मशानभूमीतील मरणयातानांना तोंड देत कोरोनाबाधित मृतांना अनंतात विलीन करणारे हे योद्धे कौतुकाचे खरे हकदार म्हणावे लागतील.
कोरोना योद्ध्यांचा सन्मान राखला जावा – तारेंद्र बोर्डे
वणी शहरात तसेच तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अनपेक्षित वाढत आहे. कोरोनाबाधित मृतकावर तत्काळ अंत्यसंस्कार होणे गरजेचे आहे. त्यासाठी मागील काही महिन्यांपासून पालिका कर्मचाऱ्यांचे पथक राबत आहे. कोरोनाबाधित मृतकाचा अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांकडूनही या लोकांना सहकार्य केले जावे. या कोविड योद्ध्यां सन्मान राखला जावा. – तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष वणी