जनता कर्फ्यू अपडेट: चर्चेअंती कोणत्याही निर्णयाविना संपली बैठक

अधिकाधिक लोकांचा जनता कर्फ्यूला विरोध

0

जब्बार चीनी, वणी: वणीतील वाढती रुग्णसंख्या व मृत्यू लक्षात घेऊन शहरात जनता कर्फ्यू लावावा का? याबाबत रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता शहरातील कल्याण मंडपम येथे बैठक घेण्यात आली. तिथे घनघोर चर्चा झाली. यात अधिकाधिक लोकांनी जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला. अखेर दिड तास झालेल्या या बैठकीत कोणताही निर्णय घेता आला नाही. याबाबत अधिका-यांशी चर्चा करून सोमवारी निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली. या बैठकीला शहरातील राजकिय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्यामुळे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकारातून जनता कर्फ्यूबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. संध्याकाही 7.30 वाजता मिटींगला सुरूवात झाली. बैठकीचे प्रास्ताविक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. यात त्यांनी बैठकीचा उद्देश सांगितला कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली, शिवाय जर जनता कर्फ्यू लागू करण्यात आला तर तो उत्स्फुर्त असेल. त्यात प्रशासनाचा कोणाताही सहभाग राहणार नाही असेही स्पष्ट केले.

प्रास्ताविकानंतर शिवसेनेचे दीपक कोकास, गणपत लेडांगे, मनसेचे राजु ऊंबरकर, व्यापारी मंडळाकडून राजु गुंडावार, अनिल आक्केवार, राकेश खुराना, गोपाल खुंगर, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मंगल तेलंग, दीलीप भोयर, प्रवीण खानझोडे, संजय देरकर, रज्जाक पठान, प्रमोद निकुरे, रूद्रा कुचनकार यांनी जनता कर्फ्यूबाबत भूमिका स्पष्ट केली.

जनता कर्फ्यू नकोच….
आधीच लॉकडाऊनमुळे परिस्थिती खराब आहे. त्यामुळे आता जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊन नको, असा सूर अधिकाधिक लोकांचा होता. जनता कर्फ्यू सुरू असेल तो पर्यंत रुग्णसंख्या कमी राहील मात्र पुढे काय ? असा ही प्रश्न उपस्थित करण्यात आला. दरम्यानच्या काळात बँक, एलआयसी इत्यादी गोष्टी सुरू राहतात त्यामुळे जनता कर्फ्यूला अर्थ राहत नाही. जर जनता कर्फ्यू ठेवायचा असल्यास किराणा दुकानासह शासकीय कार्यालये, बँक, एलआयसी इत्यादी कार्यालयही बंद ठेवावे असे मत मांडण्यात आले. तर वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असल्यास जनता  कर्फ्यू हा चांगला पर्याय आहे. असेही मत मांडण्यात आले.

कोविड केअर सेंटरबाबत नाराजी, अनेकदा गाडी रुळावरून खाली…
बैठक जरी जनता कर्फ्यूसाठी असली तरी चर्चेत दुसराच विषय आणून अनेकदा गाडी रुळावरून घसरली. लोकांनी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या होणा-या गैरसोयीबाबत रोष व्यक्त केला. परसोडा येथे रुग्णांसाठी पुरेशी व्यवस्था नाही, तिथे लोकांचे हाल सुरू आहे असा आरोप करत जनता कर्फ्यू ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये लोकांना अधिकाधिक पायाभूत सुविधा द्यावी अशी मागणी तिथे अऩेकांकडून झाली.

बाहेरगावी गेल्याने 8.30 वाजता तारेंद्र बोर्डे बैठकीत सहभागी झाले. त्यांनी कोरोनाबाबत लोकांची सारखी विचारणा होत असल्याने सर्वांनी एकत्र येऊन काय करता येऊ शकते याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे स्पष्ट केले.

रात्री 9 वाजता बैठकी संपली. बैठकीनंतर निर्णय अपेक्षीत होता. मात्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी शासकीय अधिका-यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. आधी जनता कर्फ्यूमध्ये प्रशासनाचा सहभाग नसणार असे स्पष्ट केल्यानंतर शेवटी त्यांनी प्रशासकीय अधिका-यांशी चर्चा करून याचा निर्णय़ घेऊ असे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. बैठक चर्चेअंती विना निर्णयाने निघाल्याने सहभागी लोकांची निराशा झाली. जर निर्णय अधिका-यांची चर्चा करूनच घ्यायचा होता तर त्यांना ही बैठकीचे आमंत्रण का दिले गेले नाही? असाही प्रश्न अऩेकांनी उपस्थित केला. आमदार व नगराध्यक्ष हे जनता कर्फ्यूच्या समर्थनात असून बैठकीत अधिकाधिक लोकांनी कर्फ्यला विरोध केल्यानेच निर्णय राखून ठेवल्याचे चर्चा रंगत होती.

दरम्यान वणी बहुगुणी फेसबुक गृपवर वणी बहुगुणी तर्फे वणीत जनता कर्फ्यू ठेवावा का? विषयावर मत मागितली. यावर शेकडो जणांनी मत व्यक्त केली. यात अधिकाधिक लोकांनी जनता कर्फ्यूला नकार दिला आहे.

मत वाचण्यासाठी येथे क्लिक करा….

Leave A Reply

Your email address will not be published.