रवि ढुमणे, वणी: वांजरी येथील दोन चुलत भावांमध्ये तंबाखू देण्याचा कारणावरून वाद झाला होता. त्यात एकाला ढकलून दिल्याने मांडीचे हाड तुटले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे कारण स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणातील आरोपी युवकाला अटक केली आहे.
वांजरी येथील सुधीर मोतीराम तेलंग हा मित्रासमवेत पत्ते खेळत बसला होता. दरम्यान त्या ठिकाणी सुधीरचा चुलत भाऊ शंकर घनश्याम तेलंग आला. प्रसंगी सुधीर तंबाखू घोटत होता. इतर मित्रांना त्याने तंबाखू दिला.
त्यावेळी शंकर ने सुद्धा सुधीर ला तंबाखू मागितला होता. परंतु सुधीरने शंकरला तंबाखू दिला नाही. या कारणावरून वाद झाला. प्रसंगी सुधीरने शंकरला मारहाण करून ओट्यावरून खाली ढकलून दिले. शंकर ओट्यावरून खाली पडला त्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी शंकर ला घरी नेले व पायाला मार असल्याने वेदना कमी करण्यासाठी बाम लावून दिली.
असह्य वेदना होत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी शंकरला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु शंकरच्या मांडीचे हाड तुटल्याने हृदयाकडे जाणारा रक्त प्रवाह थांबल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यावरून वणीचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी गुन्हा नोंद करून पुढील तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल कडे दिली. सुधीर तेलंगवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची त्याला कल्पना नव्हती हाच धागा पकडून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ठाण्यात बोलाविले व अटक केली. न्यायालयाने सुधीरला या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी दिली आहे.