सुशील ओझा, झरी: तुमचे एटीएम व्हेरीफाय करायचे आहे असा कॉल करून मुकुटबन येथील एका तरुणाला गंडवण्याचा प्रकार आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी घडला. जगदिश कुंडलवार असे या फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका तासाआधीच त्या तरुणाने अकाउंटमधून पैसे काढले असल्याने तो थोडक्यात बचावला व ऑनलाईन भामट्यांना केवळ 522 रुपयांवर समाधान मानावे लागले.
जगदिश कुंडलवार हा तरुण मुकुटबन येथील रहिवाशी आहे. तो केबल टेक्निशियन म्हणून गावातच काम करतो. आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान त्याला 9883615389 व 9832741875 नंबरवरून कॉल आला. स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलत आहो व तुमच्या एटीएमचे व्हेरिफिकेशन करायचे आहे अशी बतावणी कॉल करणा-याने केली. त्यासाठी त्याला एटीएमचा संपूर्ण नंबर व एटीएमचा सीव्हीव्ही कोड (एटीएमच्या मागे असलेले तीन अंक) विचारण्यात आला. त्याने सर्व माहिती कॉल करणा-याला सांगितली. त्यानंतर त्याच्या मोबाईलवर एक ओटीपी आला. त्याने ओटीपी सांगितल्यानंतर त्याच्या अकाउंटमधून 522 रुपये कट झाले. त्याने आलेल्या नंबरवर त्वरित कॉल केल्यावर तो नंबर स्विच ऑफ दाखवत होता. त्यामुळे जगदिशला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
एक तासाआधीच काढले होते 10 हजार रुपये
जगदिशच्या एका मित्राच्या पालकाने त्याच्या मित्राला देण्यासाठी 10 हजार रुपये टाकले होते. ते पैसे त्याने आज सकाळीच एटीएममधून काढून त्याच्या मित्राला दिले होते. त्यामुळे त्याच्या अकाउंटमध्ये केवळ मोजकेच पैसे शिल्लक होते. जर कॉल एक तास आधी आला असता किंवा त्याने पैसे काढले नसते तर त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. मात्र केवळ सुदैवाने तो आर्थिक नुकसानीपासून वाचला. याबाबत अद्याप पोलिसात किंवा सायबर क्राईमकडे तक्रार करण्यात आलेली नाही.
ओटीपी कुणालाही सांगू नका….
बँकेद्वारा वेळोवेळी आपला ओटीपी कुणालाही सांगू नका तसेच एटीएम बाबतची माहिती कुणालाही फोनवर देऊ नका असे सांगण्यात येते. तसेच बँक कोणत्याही ग्राहकांना माहिती विचारण्यााठी कॉल करत नाही असेही बँकेने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही एटीएम कार्ड एस्पायरी झाले, ऍप ब्लॉक झाले असे कारणे देऊन फसवणूक केली जाते. तरी कुणीही एटीएमची माहिती व ओटीपी मागत असेल तर तो कॉल फ्रॉड समजून अशी माहिती कुणालाही सांगू नये अशी सूचना केली आहे.
फसवणूक झाल्यास काय करावे?
फसवणूक झाल्याबरोबर तात्काळ याबाबत बँकेला माहिती दिल्यास ते पैसे परत मिळण्यास मदत होऊ शकते. यवतमाळ येथील एका पेन्शन अकाउंटमधून काढण्यात आलेले लाखो रुपये बँकेने परत मिळवून दिले होते. या शिवाय सायबर क्राईम विभागाकडे याची तक्रार केल्यास आरोपींवर कार्यवाही होऊ शकते.
कशी घ्यावी खबरदारी ?
या सारख्या एसएमएसपासून राहा सावध
– Your Paytm KYC has expired (तुमची पेटीएम KYC संपली आहे)
– Or it needs to be renewed (याला नुतनीकरण करण्याची गरज आहे)
– Or your account will be blocked in 24 hours (तुमचे अकाउंट २४ तासांत ब्लॉक करण्यात येईल.
असा होतो फ्रॉड…
तुम्हाला एसएमएस किंवा फोन करून केवायसी किंवा अन्य कारण सांगून वैयक्तिक माहिती विचारली जाते. अनेकवेळा युजर्संकडून Anydesk या सारखा कोणताही ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. Anydesk, TeamViewer, किंवा QuickSupport यासारखे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर एक ९ डिजिट कोड जनरेट केले जाते. युजर्सला या कोड मागितले जाते. कोड मिळाल्यानंतर हॅकर्स तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळतो. आता तुमच्या फोनची स्क्रीन सहज ट्रॅक केले जाते. यावरून पेटीएम आणि मोबाइल बँकिंग ऍप अॅक्सेस घेतात व तुमचे अकाउंट रिकामे करू शकतात.
एक अन्य प्रकार म्हणजेच पेटीएम सारखी दिसणारी फेक वेबसाईट बनवून तुमचे पासवर्ड आणि ओटीपी जाणून घेतात. हॅकर्स wwww.paytmuser.com, wwww.kycpaytm.in अशा वेबसाईट बनवतात. ही दिसायला अधिकृत वेबसाइट दिसते. परंतु, ती खोटी असते. युजर्स या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती नमूद करताच ही माहिती हॅकर्सला मिळते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)