जेव्हा माणुसकी धावून येते… जखमीवर उपचार सुरू
शिक्षक गुणवंत पचारे यांची अपघातग्रस्ताला आर्थिक मदत
जब्बार चीनी, वणी: माणुसकी जिवंत राहिली नाही अशी सर्वांची ओरड असते. आज सख्खेही सख्ख्यांच्या कामात येत नाही, असंही बोललं जातं. मात्र शिक्षक गुणवंत पचारे यांनी माणुसकीचा आदर्श जगापुढे ठेवला. अपघातग्रस्त गरीब विद्यार्थ्याच्या मदतीसाठी त्यांच्यातली माणसकी धावून आली. तालुक्यातील बोर्डा येथील कुंदन सुरेश पानघाटे हा शाळकरी मुलगा रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावरील उपचारांकरिता पचारे ह्यांनी 16016 रूपयांची मदत केली.
विद्यार्थी कुंदन ह्याचा रस्त्यावर अपघात झाला, तो बेशुद्ध झाला. त्याला चंद्रपूर येथे एका खासगी रूग्णालयातील आय.सी.यू,त भरती करण्यात आले. मेंदूला जबर दुखापत झाल्यामुळे उपचार गुंतागुंतीचे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या पानघाटे कुटुंबाला पैसा कसा जुळवायचा हा प्रश्न पडला. तेथील शाळेतील शिक्षक गुणवंत पचारे यांना ही वार्ता कळली. त्यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून काडीचाही विचार न करता सपत्नीक या गरीब कुटुंबाला उपचारासाठी 16016 रुपये रोख रक्कम दिली.
या प्रसंगी सरपंच प्रवीण मडावी, उपसरपंच गणेश पायघन, शाळा समिती अध्यक्ष संजय वाभिटकर, रामदास बोढे, कवडू वडस्कर, विठ्ठल माटे, तथा गुरुदेव सेवा मंडळ नवेगाव(विरकुंड) येथील पदाधिकारी उपस्थित होते. माणुसकीचा गहिवर दाटून येतो. तेव्हा माणसातला माणूस जागा होतो. माणूस हेच एक नातं जोपासत शिक्षक पचारे यांनी माणुसकीचा झरा जिवंत ठेवला.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)