विलास ताजने वणी: वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील शिवारात शेतकऱ्यांना वाघ दिसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. परिणामी वनविभागाने जंगलात , शिवारात ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत वाघाच्या पंजाचे ठसे गुराख्याला दिसल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. ही बाब ताजी असताना येनक येथील शेतकरी सुरेंद्र गोखरे हा शेतकाम करीत असताना त्याला मंगळवारला वाघ दिसला. त्यामुळे तो घाबरून गावात धावत पळत आला. सदर माहिती गावात कळताच गावातील युवक गोखरे यांच्या शेताच्या दिशेला गेले. त्यावेळी वाघाच्या पंजाची ठसे आढळून आले.
मागील पंधरवड्यात कुर्लीच्या बंदीत एका गुराख्याला वाघ आणि बछडे यांच्या पंजाचे ठसे आढळले होते. त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी एम.आर. वालकोंडावार यांनी कवडसी, शेवाळा, आबाई, सावंगी, कुर्ली आदी गावात दवंडीद्वारे ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली होती. आता येनक (चिखली) शिवारात वाघ दिसल्याने नागरीकांच्या भीतीत भर पडली.