विलास ताजने, वणी: मेंढोली येथील एका शेतकऱ्याच्या चार एकरातील कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. परिणामी सदर शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.
वणी तालुक्यातील मेंढोली येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर नारायण खाडे यांच्याकडे चार एकर शेती आहे. संपूर्ण शेतात त्यांनी कपाशीची लागवड केली आहे. कापसाच्या पहिल्या वेचणीला सुरुवात झाली आहे. कापूस वेचणी करताना कपाशीच्या झाडाला धक्का लागताच झाडाची बोंडं झाडावरून गळून पडतात.
पडलेल्या बोंडाला फोडून पाहणी केली असता बोंडात अळी दिसून येत आहे. बोंडअळीमुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. चार एकरात केवळ सहा ते आठ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. परिणामी खाडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शिवारातील अन्य शेतकऱ्यांच्याही कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेताची प्रत्यक्ष पाहणी करावी. नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशी मागणी शंकर खाडे यांनी केली आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)