सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: “महारानी राज तुंदु जाना ओरो अबुआ राज एते जाना”चा नारा त्या तरुणाने दिला. ब्रिटीश महाराणीचे राज्य जावो आणि आमचे राज्य स्थापित होवो असा त्याचा अर्थ.
इंग्रज, सावकार आणि जमिनदारांकडून होणाऱ्या शोषणाविरोधात या युवकाने एक चळवळ उभी केली. सर्वच शोषणाविरोधात महाविद्रोह अर्थात ‘उलगुलान’ पुकारले. 15 नोव्हेंबर ही त्यांची जयंती. सन 1875ला त्यांचा जन्म झाला. त्यांची प्रेरणा, क्रांती आजही अनेकांना दिशादर्शक ठरत आहे. वयाच्या अवघ्या जवळपास 25 व्या वर्षी क्रांतीसाठी 9 जून 1900 रोजी हौतात्म्य पत्करणारा हा युवक त्यांच्या समुदायासाठी ‘भगवान’ झाला. ‘धरती आबा’ म्हणजे धरतीचा बाप म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. या क्रांतिकारी महामानवाचे नाव बिरसा मुंडा. त्यामुळे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना समजून घेणं आवश्यक आहे. बिहार, ओडिसा, झारखंड, छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल या भागात मुंडा आदिवासी आढळतात. सुगना मुंडा आणि करमी हातू हेदेखील पोटापाण्यासाठी भटकत होते. या दाम्पत्याच्या पोटी उलिहातू या गावी बिरसा नामक क्रांतिसूर्याचा जन्म झाला. गुरुवारी म्हणजे बृहस्पतीवारी जन्म झाला म्हणून बिरसा हे नाव देण्यात आलं. इंग्रज आणि स्थानिक शोषकांविरोधात लढा देणाऱ्या या क्रांतिकारी युवकाचा जीवनप्रवास चित्तथरारक आहे. पशू चारणे आणि अन्य कामं बिरसा लहानपणापासून करायला लागले. छोट्याशा बिरसाचे मन जंगलात रमत असे. त्यांना बासरी वाजवण्याचा छंद होता. त्यांनी स्वत:देखील एक वाद्य तयार केले होते. ते जंगल आणि पशू-पक्षांसोबत बोलत, असे त्यांचे अनुयायी मानतात. वडील सुगना आणि आई करमी हातू आपल्या या गुणी लेकरातील चुणूक पाहत होते. त्यांनी बिरसा यांना त्यांच्या मामा कडे अयुबहातू या गावी पाठवले. सालगा गावात त्यांचे आरंभीचे शिक्षण झाले. नंतर ते चाईबासा येथील स्कूलमधे दाखल झालेत. इंग्रजी शाळेत ते शिकू लागले. त्यांचा ख्रिश्चन धर्माशी संबंध आला. त्यांना बिरसा डेव्हीड अथवा बिरसा दाऊद ही नवी ओळख मिळाली. दिकू, सावकार, जमिनदार आणि ब्रिटीश सावकारांकडून होणारे शोषण ते प्रत्यक्ष पाहायला लागलेत. ‘साहेब साहेब एक टोपी’ हा अनुभव त्यांनी घेतला. विद्रोहाचे आणि क्रांतीचे बीजारोपण लहानपणीच त्यांच्यात झाले. शाळा व शिक्षण सुटले. लग्नानंतर मावशीने त्यांना सासरी नेले. लहानपणापासूनच त्यांची भटकंती सुरू झाली. आनंद पांडे यांच्या माध्यमातून बिरसा वैष्णव धर्माच्या संपर्कात आलेत. रामायण, महाभारत आणि अन्य ग्रंथांतील पात्र त्यांना कळू लागलेत. जंगली औषधी वनस्पतीचे ज्ञान त्यांनी मिळवले. पुढे त्याचा उपयोग त्यांनी आपल्या समाजासाठी केला. ते आपल्या समाजातील दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि विविध आजारांचे बळी प्रत्यक्ष पाहत होते. अनुभवत होते. फॉरेस्ट अॅक्टने आदिवासींच्या पाठीचा कणाच मोडला. आता क्रांतीशिवाय पर्याय नाही हे बिरसा यांनी जाणले. त्यांनी ‘उलगुलान’ पुकारले. उलगुलान म्हणजे जल, जंगल आणि जमिनीसाठीचा संघर्ष किंवा क्रांती. उलगुलान म्हणजे सर्वच शोषणांच्या पातळीवर एकाच वेळी केलेला उठाव. मुंडारी बोलीतील हा शब्द आहे. हिंदी साहित्यिक महाश्वेतादेवी यांनी त्यांच्या ‘अरण्येर अधिकार’ या कादंबरीत बिरसा आणि आदिवासी बांधवांचा जीवनसंघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला.
लोक त्यांना ‘भगवान’ मानू लागले. दिकू म्हणजे गैरआदिवासी शोषक सावकार किंवा जमिनदार यांच्यासह ब्रिटिशांविरूद्ध त्यांनी लढा पुकारला. विविध साथीच्या आजारांत त्यांनी रुग्णसेवा केली. त्यांनी बिरसाधर्म स्थापन केला. समाजातील अंधश्रद्धा आणि कुरीतींवर हल्लाबोल केला. इंग्रजांना जाचक कर द्यायचा नाही. मादक पदार्थांचे सेवन करायचे नाही. स्वच्छता आणि आरोग्य याकडे नीट लक्ष द्यायचे. अंधश्रद्धा पाळायची नाही. बळीप्रथा बंद करायची. अशा अनेक शिकवणीतून त्यांनी लोकजागृतीचे कार्य सुरू केले. लोक त्यांच्याशी जुळायला लागले. बिरसा यांचा विचारप्रवाह आणि त्याच्याशी जुळलेले अनुयायी बिरसाईत म्हणून ओळखले जाऊ लागलेत. छोटा नागपूर आणि परिसराला 1894 साली दुष्काळाचा फटका बसला. यात बिरसा यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली. आरोग्यसेवा दिली. बिरसा मुंडा यांचे नेतृत्व बहरत होते. त्याला एक वैचारिक बैठक होती. जल, जंगल आणि जमीन या तीन विषयांना ते फार महत्त्व देत. इंग्रजांनी लादलेला शेतसारा (लगान) आदिवासींना जाचक ठरत होता. त्या विरोधात बिरसा यांनी 1 ऑक्टोबर 1894 रोजी आंदोलन पुकारले. इंग्रजांनी त्यांना 1895 मधे पकडले. त्यांना दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा इंग्रजांनी ठोठावली. हजारीबाग येथील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी आंदोलन तीव्र केले. त्यांच्या अनुयायांनी आंदोलन जिवंत ठेवले होते. बिरसा यांनी ‘अबुआ दिशुम अबुआ राज’ (आमचा देश, आमचे राज्य) ही घोषणा पूर्वीच केली होती. इंग्रज आणि दिकू हे आदिवासी संस्कृती आणि जीवनमानाचा उपहास करायचे. बिरसा यांनी आपल्या ज्ञातीबांधवांना त्यांच्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या धर्माची महती सांगितली. आता बिरसा यांनी आंदोलनाची दोन भागांत विभागणी केली. पहिली धार्मिक आणि दुसरी राजकीय चळवळ त्यांनी सुरू केली. दोन्ही तुकड्यांना त्यांनी योग्य प्रशिक्षण दिले. ठिकठिकाणी हे विचार आणि क्रांती पोहचवण्याचे कार्य युद्धपातळीवर या तुकड्यांनी केलं. बिरसा आणि त्यांच्या ज्ञातीबांधवांचा हा संघर्ष सुरूच होता. इ.स. 1897 ते 1900 या काळात अनेक लढाया झाल्यात. क्रांती परमोच्च शिखरावर होती. बिरसा आणि त्यांची क्रांती इंग्रज, शोषक सावकार आणि जमिनदारांना भारी पडत होती. इंग्रजांनी त्यांच्यावर 500 रूपयांचे रोख बक्षीस ठेवले. आजपासून जवळपास 100 वर्षांपूर्वी 500 रूपये ही खूप मोठी रक्कम होती. इंग्रजांच्या प्रलोभनाला बळी पडून ज्ञातिबांधवानेच घात केला. डोम्बाडी परिसरात बिरसा मुंडा असल्याची माहिती फितुराने इंग्रजांना दिली.
3 फेब्रुवारी 1900 रोजी चक्रधरपूर येथे इंग्रजांनी त्यांना पकडले. त्यांची रवानगी तुरुंगात झाली. 9 जून 1900 रोजी रांची येथील तुरुंगात बिरसा मुंडा शहिद झालेत. ते आजाराने मरण पावल्यांचे इंग्रज म्हणाले; मात्र त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे म्हटले जाते. त्यांचं नाव रांचीच्या विमानतळ तुरुंगासह विविध ठिकाणांना दिलं आहे. झारखंडात अनेक ठिकाणी त्याचे पुतळे आणि स्मारक आहेत. रांची परिसरात त्यांची समाधी आहे. आजही ते भगवान म्हणून पूजले जातात. जल, जंगल आणि जमिनीसाठी बिरसा आयुष्यभर संघर्षरत राहिलेत. त्यांनी आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात जागृतीचे कार्य केले. भारतीय स्वातंत्रलढ्यात त्यांचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांना अनेक पातळ्यांवर लढावे लागले. त्यांच्या या लढ्याचे फलस्वरूप आजही बघावयास मिळते.
आदिवासी बांधवांना न्याय आणि हक्कासाठी त्यांची प्रेरणा आजही आहे. लोकगीत, लोकवाडमयातून बिरसा मुंडा आजही जिवंत आहेत. ते बिरसा भगवान यांची आजही वाट पाहत आहेत.
हेदेखील वाचा
|
|