काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गुढ

'या' कारणासाठी केली होती हत्या

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हत्या करून हा मृतदेह टाकल्याचे समोर आले होते. याबाबत अनेक चर्चेला उधाण आले होते. मात्र आरोपी सापडल्याने खुनाचे कारण स्पष्ट झाले असून विविध चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मारेगाव येथील योगेश रामभाऊ गहुकर (28) हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तासिका तत्वावर निदेशक म्हणून कार्यरत होता. शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर सकाळी 7 वाजत वाहन चालक परवाना काढण्याकरिता तो मारेगाव येथील घरातून वणी येथे जाण्यास निघाला. परंतु रात्री उशिरा पर्यत घरी न पोहोचल्याने व मोबाईल बंद असल्यामुळे त्याच्या घरच्यांच्या चिंतेत वाढ झाली. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मारेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

बेपत्ता झाल्यापासून त्याच्या कुटुंबियांनी काही लोकांना सोबत घेऊन शोधाशोध सुरू केली होती. तसेच पोलीसही योगेशचा शोध घेत होते. अखेर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान वणी शहराजवळील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ पोलिसांना योगेशचा मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी पाहणी करून सदर मृतदेह हा योगेशचा असल्याची खात्री केली.

True Care

असे उलगडले हत्येचे गुढ!   

पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवीत काही तासांमध्येच दोन आरोपीला अटक केली. पोलिसांनी राजू रामकृष्ण भोंगळे राहणार मारेगाव व सुशांत बाळनाथ पुनवटकर राहणार कोलगाव ता. मारेगाव यांना अटक केली. त्यांनी पैशाच्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास एपीआय माया चाटसे करीत आहे. योगेशच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!