पत्रकाराच्या अटकेविरोधात झरी तालुक्यातील पत्रकार एकवटले
ठाणेदारांना निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी
सुशील ओझा, झरी: प्रभाकर भोयर मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याबाबत झरी तालुक्यातील पत्रकारांनी मुकुटबन ठाणेदारांची भेट घेतली. दरम्यान ठाणेदार धर्मा सोनुले यांच्या मार्फत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी मुकुटबन आणि झरी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार विवेक तोटेवार यांच्या अटकेचे पडसाद मुकुटबन येथेही दिसून आले. तालुक्यातील विविध पत्रकार संघटना व गावातील पत्रकार यांनी एकत्र येत ठाणेदार यांची भेट घेतली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. चर्चेनंतर पत्रकारांनी ठाणेदारांमार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर केले.
प्रभाकर भोयर मृत्यूप्रकरणी वणी शहरातील पत्रकार विवेक तोटेवार यांना दिनांक 10 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांनी कव्हर केलेल्या एका बातमीच्या आधारे ही अटक झाली आहे. एखाद्या बातमीच्या आधारे जर पत्रकारांना अटक होत राहिली तर पत्रकारांना पत्रकारिता करणे कठीण होईल. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मीडियाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर हा घाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांनी निवेदनातून केली.
यावेळी पत्रकार सुशील ओझा, प्रेम नरडलवार, जयंत उदकवार, देव येवले, निसार शेख, संकेत गज्जलवार, संघर्ष भगत, पुरुषोत्तम गेडाम, गणेश मुद्दमवार आदी पत्रकार उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की शेतमालक मृतक प्रभाकर भोयर यांच्या शेतात त्यांच्या सालगड्याचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता. शेतमालकाने याबाबत कोणतेही नुकसान भरपाई (कम्पेन्सेशन) देण्यास असमर्थता दर्शवली. मृतक सालगड्याच्या मुलांनी प्रत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे आर्जव करीत विवेक तोटेवार यांची भेट घेतली होती. विवेक यांनी बातमीच्या स्वरुपात त्यांची बाजू मांडली. सोबतच मृतक प्रभाकर भोयर यांचे स्टेटमेंट घेऊन त्यांची देखील बाजू बातमीत मांडली होती.
बातमी आल्याच्या काही दिवसांनी शेतमालक प्रभाकर भोयर यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. सुमारे 15 दिवसांनी त्यांचा नागपूर येथे मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन झाले नाही, शिवाय त्यांचे मृत्यूपूर्व कोणतेही बयान झाले नाही. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र प्रभाकर भोयर यांच्याशी कधीच भेट झाली नसताना किंवा त्यांच्याशी कोणता संपर्क नसतानाही पत्रकार विवेक तोटेवार यांना अटक करण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे.
सर्वसामान्यांची, अन्यायग्रस्तांची बाजू मांडणे हा पत्रकारांचा धर्म आहे. पत्रकारितेचा धर्म पाळून त्यांनी बातमी केली. मात्र त्यात त्यांनाच आरोपी करण्यात आले. केवळ त्यांना एकट्यांनाच सराईत गुन्हेगार व सूत्रधार असल्यासारखे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या पत्रकारांनी अन्यायग्रस्तांची बाजू मांडावी की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला.
हे देखील वाचा….
हे देखील वाचा….