वणी: मन व मनगट मजबूत असेल तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता मनुष्यात निर्माण होते. मन आणि मनगट मजबूत करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखेत होते. त्यामुळे संघाची शाखा हे संघाचं हृदय आहे. असे प्रतिपादन अकोला जिल्हा संघाचे प्रचारप्रमुख महेंद्र कविश्वर यांनी केले. ते वणी येथील विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
वणीतील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्रागणात दि.7 ऑक्टोबरला पार पडलेल्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून महेंद्र कविश्वर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर सूर हे होते. अतिथी सोबत व्यासपीठावर वणी तालुका संघचालक हरिहर भागवत हे उपस्थित होते. शस्त्र पूजन करून अतिथींच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर गणवेषधारी स्वयंसेवकांनी योगासन प्रात्यक्षिक, दंड प्रात्यक्षिक, सांघिक व्यायाम योग सादर केला. या उत्सवाचे प्रास्ताविक नगर कार्यवाह राम देशपांडे यांनी केले. अमृत वचन रुपेश निमकर व वैयक्तिक गीत दीपक नवले यांनी सादर केले.
आपला विषय पुढे मांडताना महेंद्रजी म्हणाले की, आसुरी शक्तीचा निःपात करून ज्याचा उत्सव म्हणून जो विजयोत्सव साजरा करतो त्यादिवशीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आहे. जो या देशाला आपलं मानतो तो स्वयंसेवक संघाला समजून घेण्यासाठी संघात येऊन तो अभ्यासल्या नंतरच तो कळेल. विश्व विजयाचे स्वप्न दाखवून ते प्रत्यक्षात उतरविण्याचे काम संघाचं करू शकतो. संघ ही संस्काराची कार्यशाळा आहे. येथे शिस्त, अनुशासन व वेळेचे नियोजन शिकवून जीवन जगण्याची पद्धत शिकविल्या जाते. प्रत्येक स्वयंसेवकाला स्वयंसिद्ध बनविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयं सेवक संघातर्फे एक लाख बासष्ठ हजार प्रकारचे सेवा प्रकल्प देशात सुरू आहे. या उत्सवात शस्त्राचे पूजन करून शौर्याच्या प्रतीकांचा आदर केल्या जातो.
अतिथी म्हणून बोलताना प्रभाकर सूर म्हणाले की, निस्वार्थ सेवा हा या संघटनेचा आत्मा आहे. प्रत्येक स्वयंसेवक हा भारताचा चांगला नागरिक आहे. शिस्तबद्धता हे वैशिष्ट्य असलेलं हे जगातील एकमेव संघटन असल्याच प्रतिपादन त्यांनी केले. उत्सवाला शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.