आला रे आला वाघ आला, वाघ आल्याच्या अफवेने हाहाकार

वाघाचा फेक फोटो व्हायरल झाल्याने पांडवदेवी परिसरात दहशत

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी परिसरात वाघ आल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली आहे. वाघाच्या दहशतीने परिसरातील लोकांनी शेतात जाणं बंद केलं आहे. गेल्या महिन्यात मारेगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात सराठी ता. राळेगाव येथील एका इसमाचा मृत्यु झाला होता. त्यामुळे नागरिक आणखीनच दहशतीत आले आहेत.

मंगळवारी दि. १० आॅक्टोबरला सोशल मिडियावर पांडवदेवी मंदिर परिसरात वाघ असल्याचा फोटो कुणीतरी पोस्ट केला. हा फोटो काही वेळातच फेसबुक आणि वॉट्सऍपच्या माध्यमातून व्हायरल झाला. त्यामुळे परिसरातील जनते मधे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये असलेल्या वाघाची सावली पडत नसल्याने, पाहनार्याच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे हा हा फोटो बनावट असल्याचं बोललं जात आहे.

या संदर्भात मारेगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी जे.व्ही घुगे यांना माहिती विचारली असता, त्यांनी त्या वायरल फोटो संदर्भात चौकशी व परिसराची पाहणी केली. वनविभागाने पांढरकवडा वनविभागाला या व्हायरल फोटो संदर्भात माहिती दिली असुन, तालुक्यातील खंडणी,बोटोणी व सराठी परिसरातील जनतेने एकटे जंगल परिसरात जाणे शक्यतो टाळावे अशी खबरदारी घ्यायला सांगितली आहे. याप्रकरणी वनविभागाने सर्च आॅपरेशन करुन वाघाचा शोध घेतला पण वनविभागाला वाघ शोधण्यात अपयश आले.

सध्या शेतकऱ्यांचा कापुस वेचणीचा हंगाम आहे, त्या परिसरातील शेतकऱ्यांची शेती जंगल परिसरात असल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांना, शेतकरी महिलांना शेतात जावे लागते, परंतु वायरल झालेल्या वाघाच्या फोटोने पांडवदेवी परिसरातील नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.

सध्या कापूस वेचणीच्या हंगामात फोटो कुणी वायरल केला हा प्रश्न सर्वांना पडला असुन दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतातुन कापूस चोरून वेचून नेण्याचे प्रकार वाढत आहे. हे काम ह्या हेतुने तर केले नाही ना, अशीही शंका काही लोक उपस्थित करीत आहे. तरी सोशल मिडियावर व्हायरल झालेला वाघ सध्या चर्चेचा विषय झाला, हे मात्र खरे… वणी बहुगुणीही सर्वांना आवाहन करत आहे की वॉट्सऍप आणि फेसबुकवरच्या फेक पोस्टवर विश्वास न ठेवता खात्री केल्याशिवाय कोणतेही फोटो किंवा पोस्ट शेअर करू नका असं आवाहन करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.